पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण १३ वे





संस्कृत नाट्यशास्त्राने उभे केलेले प्रश्न



  अण्णासाहेब कारखानीस यांच्या स्मृतीला त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आपण सारेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रांत ज्या महनीय व्यक्तींनी काही प्रथा, परंपरा रुजविण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांच्याच विषयी माझ्या मनात अत्यंत कृतज्ञता भाव आहे.पारतंत्र्याच्या त्या काळात ज्या मंडळींनी स्वतंत्र भारतात ज्याचा चौरस विकास होईल अशी रास्त अपेक्षा आहे त्या सांस्कृतिक जीवनाचा गाभा आपापल्या परीने जतन करण्याचा प्रयत्न केला. स्वतंत्र भारतातल्या सांस्कृतिक समृद्धीविषयीच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलेलो नसू पण ज्यांच्याकडून नव्या सांस्कृतिक समृद्धीच्या प्रेरणा घेणे आपल्याला भाग आहे त्या सर्व वंदनीयांना आणि त्यांच्यापैकी एक म्हणून कै. कारखानीसांना स्वतंत्र भारतातील एक नागरिक या नात्याने विनम्र अभिवादन करणे हे मी माझे कर्तव्य मानतो.
  ज्या पद्धतीने मी कै. कारखानीसांच्याकडे पाहतो त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात अधिकच सुहृदभाव निर्माण झाला आहे. जीवनाकडे पाहण्याची एक दृष्टी मिथ्या अहंतेची आणि भूतकालाविषयीच्या अंध गौरवाची असते. कोणे एके काळी जगातले सर्व सत्य शोधून झालेले आहे असे गृहित धरून काहीजण भूतकाळाचा विचार करतात. या मंडळींच्यासाठी विकास नावाची कल्पना वर्ण्य असते. भूतकालात काही उणिवा असतील, भूतकालीन आचार्यांना काही गोष्टी जाणवल्या नसतील, त्यांचे काही निर्णय चुकले असतील असे वाटतच नाही. भूतकालाचे समर्थन आणि या समर्थनाच्या दर्पणात सर्व भविष्यकालाचे मार्गदर्शन शोधण्याचा या गटाचा प्रयत्न असतो. या अगदी

रं....१३
संस्कृत नाट्यशास्त्राने उभे केलेले प्रश्न / १९३