पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सत्य असे आहे की, मध्ययुगीन मूल्ये प्रमाण मानली, तर त्या चौकटीत कर्मठपणा आणि विषमता या दोहोंच्याही विरुद्ध असलेली वारकरी समाज ही सर्वसामान्य जनतेची एक महत्त्वाची चळवळ आहे आणि त्याबरोबरच इ. स. च्या एकोणिसाव्या शतकापासून सर्व परंपरावाद प्राणपणाने जतन करणारी ही सनातन्यांची एक अत्यंत बलवान आणि जुनाट विचारांची अशी आघाडीही बनलेली आहे. काळाच्या ओघात जातिबहिष्कृताने सुरू केलेली ही जनतेची चळवळ सर्वांना बहिष्कृत वातावरणात ठेवणारी एक महत्त्वाची शक्ती म्हणून पुढे आलेली आहे. समतेचा जयघोष करीत विषमता जतन करणारी, विषमतेच्या रक्षणार्थ सर्व अत्याचार करून ते पाप दररोज भजनात धुऊन काढणारी अशी ही वारकरी समाजाची वर्तमानकालीन परिस्थिती आहे. या एकांकिकेतील वारकरी दिंडीला 'आवर्त' म्हणून एक महत्त्वाचे स्थान आहे. प्रा. दत्ता भगत यांच्या लिखाणातील आशयही रूपाच्या इतकाच महत्त्वाचा आहे.
 प्रा. दत्ता भगत यांच्या या एकांकिका तंत्रदृष्ट्या नेहमीच निर्दोष उतरलेल्या आहेत, असे नाही. प्रायः जिवंत वाङ्मय तंत्रदृष्ट्या सदोष असतेच. अशा वेळी तंत्राचे दोष क्षम्य असतात. या एकांकिकांचे कलात्मक मूल्य काय, यावर मी मत देण्याचे टाळलेले आहे. कारण या क्षणी माझ्यासमोर आद्य महत्त्वाचा मुद्दा तो नाही. तुम्ही या सर्व एकांकिका कलादृष्ट्या संपूर्णपणे अयशस्वी आहेत, असे म्हणू शकता. त्याचे उत्तर जेव्हा वेळ येईल, तेव्हा देता येईल. पण हे प्रचाराच्या अतिरेकात एकांगी आणि आक्रस्ताळे झालेले वाङ्मय नव्हे. या वाङ्मयाची प्रवृत्ती विटंबन-विडंबन नव्हे, तर या वाङ्मयाची प्रकृतीच प्रचाराच्या विरुद्ध, करमणुकीच्या विरुद्ध मानवी मनाचे गुंतागुंतीनिशी युक्त घेण्याची आहे, असे मला वाटते. दलित साहित्याचा भाग असणाऱ्या या एकांकिका ललितवाङ्मयाची मूळ प्रकृती जतन करीत साकार होत आहेत, एवढा मुद्दा समोर ठेवणे हा या क्षणी माझा हेतू आहे आणि मला वाटते की, आजच्या वातावरणात हा मुद्दा आग्रहाने सांगणे अधिक महत्त्वाचे आहे.

♣'

१९२ / रंगविमर्श