पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाढले, तर एका गंभीर आशयाचा अत्यंत स्थूल आणि उथळ फार्स होत असतो आणि जर उद्वेगाचे प्रमाण मर्यादा सोडून वाढले, तर मग लोकनाट्यातील खेळकरपणाचा आकार त्या सगळ्या गंभीर नाट्याला विसंवादी वाटू लागतो. या दोहोंचा सांधा लेखकाने जागोजाग जुळवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, तो वाङ्मयरूपांचा अभ्यास म्हणूनसुद्धा विचारात घेण्याजोगा आहे. आशयाच्या दृष्टीने या नाटिकेतील काही बाबी महत्त्वाच्या आहेत. यातील एक महत्त्वाची बाब न्यायपंचायत ही आहे. आपल्या राजकारणात काही स्वप्नाळूपणाचे पदर आहेत. या सप्नाळूपणापैकी गावातील पंचांची न्यायपंचायत हा एक महत्त्वाचा मुद्दा • आहे. ही स्थानिक ग्रामीण भागातील पंचमंडळी न्याय देण्यासाठी जेव्हा उभी राहते, तेव्हा त्यांनी जे परंपराप्राप्त आहे, ते न्याय्य आहे, ही भूमिका स्वीकारलेली असते. एका मागासलेल्या अशा समाजव्यवस्थेत परंपरावादी मत ग्रामीण भागात अधिक बलवान असणार, हे उघड आहे. अशा वेळी 'पाचामुखी परमेश्वर' या म्हणीचा अर्थ परंपरेतील सर्व विषमता आणि अन्याय जतन करणे हेच परमेश्वराचे रूप आहे, असा होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या सामाजिक तथ्याकडे पुनः पुन्हा लक्ष वेधलेले आहे.
  बाबासाहेब म्हणतात, "लोकशाहीच्या प्रक्रियेत प्रौढ मतदानामुळे ग्रामीण भागातील परंपरावादी शक्तीचे बळ अल्पावधीसाठी का होईना, पण मोठ्या प्रमाणात संघटित आणि बलशाली झालेले असते. ज्यांच्या हातात पूर्वी धनसत्ता आणि धर्मसत्ता होती, त्यांच्या हातात धनसत्ता व धर्मसत्तेच्या जोडीला राजसत्ताही येते. यामुळे समतेची लढाई अधिक कठीण आणि संघर्ष अधिक हिंस्र बनत जातो. कारण सरंजामशाही मनोवृत्तीला व्यक्ती हे मूल्यच मान्य नसते. डोकी बदलण्यापेक्षा डोकी फोडण्यावर त्यांचा भर जास्त असतो.” सहज जाता जाता 'लेखकाने या पंचायतीचे अत्याचारी कर्मठ स्वरूप उल्लेखिले आहे.

वारकरी समाज
  या एकांकिकेतील दुसरी महत्त्वाची गोष्ट वारकरी समाज ही आहे. आजच्या दलित लेखकांचा ज्ञानेश्वर-एकनाथांपासून गाडगेमहाराजांपर्यंत सर्वच वारकऱ्यांना मनातून विरोध असतो. काहींचा विरोध ते स्पष्टपणे नोंदवितात. काहींचा विरोध असा स्पष्टपणे नोंदवीत नाहीत. हा फक्त सोयीचा भाग असतो.

आवर्त / १९१