पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतेच. या रूपवैशिष्ट्याच्या दृष्टीने 'आवर्त' ही एकांकिका मुद्दाम पाहण्याजोगी आहे. ललित वाङ्मयात अतिशय गुंतागुंतीची आणि गोंधळात टाकणारी परिस्थिती नेहमी उपलब्ध असते. परंपरागत आकार क्रमाने शिळे होत जातात. म्हणून नवनवे आकृतिबंध शोधण्याचा उद्योग वाङ्मयाच्या क्षेत्रात चालूच असतो, पण त्याच्या बाजूलाच परंपरेचे आकार पुन्हा नव्याने हाताळून या परंपरागत आकारांनाच नवा अर्थ देण्याचीही धडपड चालू राहते. 'आवर्त' या एकांकिकेचे रूप काही प्रमाणात परंपरागत वगाचे आणि काही प्रमाणात परंपरागत नाटकाचे मिश्रण करून साधलेले आहे. वगनाट्य गण-गौळणीने आरंभ होते. यापैकी लेखकाने गण टाळलेला आहे. गणानंतर होणाऱ्या गौळणीत कृष्ण, त्याचा साथीदार पेंद्या अगर सोंगाड्या, एखादी गवळण असा सर्व पसारा असतो. त्यातील फक्त सोंगाड्या इथे आलेला आहे आणि अभिजात नाटकात नटी-सूत्रधाराचा प्रवेश असतो, तो सूत्रधारही इथे आहे. सूत्रधार आणि सोंगाड्या यांच्या संवादातून या नाटकाचा आरंभ होतो आणि हे नाटक लोकनाट्याच्या परंपरेप्रमाणे कोणत्या तरी एका कालखंडातील वारकऱ्याच्या दिंडीपर्यंत येऊन पोचते. लोकनाट्यात नाट्यांतर्गत पात्रेच नेहमी दोन पातळीवर वावरतात. 'आपण पन्नास-साठ वर्षे मागे जाऊ' असे सांगून एका दिंडीपर्यंत हे नाट्य जाते, पण पन्नास वर्षांपूर्वीच्या दिंडीच्या घटनेत समाविष्ट होताना सोंगाड्या पन्नास वर्षांनी लहान होत नाही, तो तेवढाच राहतो. प्रत्येक पात्र एकेका भूमिकेशी समरस होते आणि मधूनच स्वतःच्याच भूमिकेकडे तटस्थ होऊन पाहू लागते. हे सगळे परंपरागत लोकनाट्याला वर्तमानाचा सामाजिक आशय निवेदन करण्यासाठी माध्यम म्हणून वापरण्याचे प्रकार आहेत.

लोकनाट्याचा बाज
  सामान्यपणे जे अतिशय गंभीर आणि उद्विग्न करणारे आहे, ते खेळकर आणि हास्यास्पद करता येत नाही. लोकनाट्याचे यशच यात असते की, ते खेळकरपणा, त्याबरोबर येणारा उपहास आणि उपरोध यांची सोबत न सोडता गंभीर आशयाकडे जाण्याची धडपड करीत असते. अत्यंत उद्वेगजनक वास्तव त्यातील उद्वेगाची कडवट धार बोथट होऊ न देता खेळकरपणे मांडण्याचा हा एक प्रयोग आहे. या प्रयोगात धोका असतो. जर खेळकरपणाचे प्रमाण थोडे

१९० / रंगविमर्श