पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मानवी मन हा अभ्यासाचा विषय
  ललित वाङ्मयात विचार असतात. विचारांना महत्त्व असते. भूमिका असतात, त्यांनाही महत्त्व असते, पण या सर्वांचे महत्त्व ज्या मानवी मनांच्या संदर्भात असते, तो ललित वाङ्मयाचा केंद्रीय शोधविषय आहे. हे मानवी मन आपल्या वासना-विकारांना कधी तत्त्वज्ञानाचा आधार शोधते आणि मग प्रदीप्त झालेली वासना बलात्कार करीत असताना आपण सामाजिक संघर्षातील एक बाजू लढवतो आहोत, अशी भूमिका घेते. कित्येकदा विचारच मनाचा आकार देतात आणि मग सर्वांविषयीची तुच्छता हा आपला स्वयंभू अधिकार आहे, असे वाटू लागते. स्वतःवर आलेल्या अडचणीच्या प्रसंगासमोर हतबल आणि दीन झालेली माणसे त्या क्षणी अडचणीत आली म्हणून लाचार होत असली, तरी त्यामुळे त्यांच्या मनाचा पीळ संपलेला नसतो आणि या संघर्षात जे समतेच्या बाजूने लढतील ते जर दुबळे असतील, तर दलितांना साहाय्यकारी ठरण्याऐवजी स्वतःच अस्पृश्य ठरण्याचा क्षण जवळ आणतील. प्रा. भगत यांच्या अभ्यासाचा विषय हे मानवी मन आहे. भूमिकांमुळे आकार घेणारे मानवी मन आणि भूमिकांनाच आपल्या गरजांचा आकार देणारे मानवी मन ह्यांच्या विविध छटा आपण एकत्र पकडू शकतो काय, या धडपडीत यशापयश पत्करणाऱ्या या प्रा. भगतांच्या एकांकिका आहेत.
  ललित वाङ्मयाचे क्षेत्र जर मूलतः मन आणि भावना असेल, तर या क्षेत्रातली लढाई ही दोन विचारांची झुंज नव्हे, तर ती निरनिराळ्या मानसिक कलांची आणि पुष्कळदा एकाच मनातील भिन्न भिन्न वृत्तींची आपापसांत असणारी लढाई आहे, या जाणिवेतून येणाऱ्या या लिखाणात सहानुभूती आणि तटस्थता, समतेचा आग्रह आणि समजूतदारपणा यांची होणारी गुंफण ही एक विलोभनीय घटना आहे. दलित साहित्यिकांच्या मनाला सुद्धा एक परिपक्व अवस्था येऊ पाहते आहे, या सामाजिक सत्याच्या या पाऊलखुणा आहेत.

आवर्त
  या एकांकिकांकडे केवळ जाणिवांच्याच दृष्टीने मी पाहतो आहे, असे नाही. ललित वाङ्मयात अनुभव घेणारे मन आणि त्या मनाची प्रत व रीत यांना महत्त्व असतेच; पण त्याबरोबरच हा अनुभव जे रूप धारण करतो, त्या रूपालाही महत्त्व

आवर्त / १८९