पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वच्छ, सुशिक्षित झाल्यामुळे तो सुसंस्कृत होईलच याची खात्री नाही आणि जो सुशिक्षित, सुसंस्कृत होईल तो ज्ञानी, शहाणा आणि सुसंस्कृत झाल्यामुळे त्याची अस्पृश्यता संपेल, याचीही खात्री नाही. तो प्राध्यापक असल्यामुळे आता आर्थिकदृष्ट्या मजूरवर्गात राहणार नाही, पण म्हणून सवर्ण त्याला भाडेकरू म्हणून घरात येऊ देतील, याची शक्यता नाही. मुळात जो प्रश्न आर्थिक आहे, तो विकसित अवस्थेत केवळ आर्थिक राहत नाही. तो मानसिक व सांस्कृतिक होत जातो.
  या घटनेचे एक रूप या एकांकिकांमध्ये प्राध्यापकाच्या चित्रणात पाहावयास सापडेल. हा प्राध्यापक 'शोध'मधला आहे. अशाच प्रकारचा एक लेखक ‘पराभव'मध्ये आहे. या प्रश्नाला दुसरी एक बाजू आहे. ती बाजू आपल्याला कावडवाल्या गोपूमध्ये पाहावयास सापडते. हा परंपरावादी मनाचा एक पुतळा आहे. तो ब्राम्हण असल्यामुळे सोवळ्याने पाणी भरतो. पण खडे टोचू नयेत, काचेने पाय चिरला जाऊ नये, म्हणून सोवळे नेसून पाणी भरताना कातडीची चप्पल घालणे समर्थनीय आहे, असे मानतो. पायाच चप्पल घालन सोवळ्याने पाणी भरणारा हा कावडवाला संपूर्ण दरिद्री आहे. त्याचा आवडता विषय फक्त खांद्याला पडलेले घट्टे हा आहे. त्यांना तो कुरवाळून पाहतो. बैलाने गळदाव्याचा अभिमान बाळगावा आणि गुलामाने बंधनाविषयी प्रेम बाळगावे, तसे कावडवाल्याचे घट्ट्यांबाबतचे प्रेम निराळे आहे. पण हा दरिद्री कावडवाला आपण केवळ दरिद्री कावडवाले आहोत, हे लक्षात ठेवून सर्वांशी बोलत असतो. त्यामुळे कोणाला तो उपदेश करीत नाही. पाणी घालत नाही म्हणून सांगत नाही. फक्त खांदे दुखतात म्हणून सांगतो. पण या वंशपरंपरागत दारिद्र्यामुळे त्याचा वर्णश्रेष्ठत्वाचा पीळ कमी झालेला नाही. आपण फक्त ब्राम्हणांच्या घरी पाणी भरतो, असा त्याचा दावा आहे. आपल्या गुलागिरीला मानसिक पातळीवर 'श्रद्धेय' रक्षणीय भूषण समजून स्वतःच्या दास्यदारिद्र्याचे प्राणपणाने जतन करणारा आणि सोवळे नेसून चप्पल घालणारा हा माणूस, दरिद्री पाणक्या असून ब्राम्हण आहे. तो जो ज्ञानी, सुसंस्कृत, कवी असून अस्पृश्य आहे, त्या सामाजिक वास्तवाचाच हा पाणक्या म्हणजे दुसरा पैलू आहे.

१८८/ रंगविमर्श