पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असे गुंतागुंतीचे चित्र या एकांकिकेत आपणांला दिसते आणि मग आपले स्वातंत्र्य सिद्ध करताना आपण नेहमीच निराधार आणि एकाकी असतो, हे सार्वत्रिक सत्य इथेही जाणवू लागते.

शोध-दलितांमधील पिढ्यांचा संघर्ष
  'शोध' सारख्या एकांकिकेत दलितांच्या घरातीलच नव्या आणि जुन्या पिढीचा संघर्ष आपल्याला दिसू लागतो. जुन्या परंपरेत रुळलेल्या आईला 'वाढण' ही अपमानाची गोष्ट आहे, ही मूल्यात्मक जाणीव पत्करणेच कठीण होऊन बसते. तिच्या दृष्टीने मुलाने पांढरीवर अजून घर बांधले नाही आणि परंपरेचा माग चालू दिला नाही, याच गोष्टी महत्त्वाच्या वाटू लागतात. परंपरावाद हा नुसता धर्माचा भाग नाही; तो मानवी मनाचाच भाग आहे. जेव्हा दुसऱ्याविरुद्ध लढायचे असते, तेव्हा परंपरावादाविरुद्धची लढाई पुरेशी अवघड असतेच; पण जेव्हा स्वतःच्याच विरुद्ध लढायचे असते, तेव्हा परंपरावादाविरुद्धची लढाई सर्वांत अवघड असते. कारण हे असे ठिकाण आहे की, तिथे कित्येकदा प्रत्यक्ष लढवय्यालाही ही रणभूमी आहे हेच जन्मभर जाणवत नाही.

मानसिक व सांस्कृतिक प्रश्न
  सामाजिक समतेचा प्रश्न हा मूलतः आर्थिक प्रश्न आहे, असे मी मानतो. तो 'मूलतः' आर्थिक प्रश्न आहे, या वाक्याचा अर्थ आणि तो आर्थिक प्रश्न आहे, या वाक्याचा अर्थ यात फरक आहे. तरुण स्त्री-पुरुषांचे परस्परांवरील प्रेम हे मूलतः निसर्गात असणाऱ्या कामवासनेचे एक रूप आहे, हे म्हणणे निराळे आणि प्रेम म्हणजे कामवासना, हे समीकरण मांडणे निराळे. मूलतः ज्या बाबी आर्थिक असतात, त्या बाबी क्रमाने संस्कृतीच्या विकासात वेगवेगळी रूपे धारण करतात आणि दीर्घ काळात पाहताना जे मूलभूत रूप महत्त्वाचे ठरते, ते अल्पावधीत पाहताना गौण ठरू लागते. मुळात आर्थिक असणारे प्रश्न क्रमाने सामाजिक होत जातात. ते धर्मात रुजतात, कला व संस्कृतीत रुजतात आणि मानसिक होऊन जातात. त्यामुळे वर्तमानकाळात त्यांचे स्वरूप नुसते आर्थिक राहत नाही. दलित समाजात जन्माला आलेला प्राध्यापक शिकलेला असतो, बुद्धिमान असतो, प्राध्यापकही असतो; त्यामुळे आता त्याला अडाणी कुणीच म्हणणार नाही, पण

आवर्त / १८७