पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भावनांच्या आवेगापेक्षा शांतपणे केलेल्या चिंतनावर अवलंबून आहे, असेही या लेखकाला वाटते, असे या एकांकिका वाचीत असताना सतत जाणवते.

मनातला परंपरावाद संपलेला नसतो
  या एकांकिकांमध्ये अजून एक महत्त्वाची जाणीव आहे आणि ती जाणीव ललित वाङ्मयाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहे. या जाणिवेचे सगळे स्वरूपच मानवी मनाशी निगडित आहे. परंपरेविरुद्ध झगडण्यास तयार झालेल्या मानवी मनातलाच परंपरावाद अजून संपलेला नसतो. सवर्णीयांनी दलितांवर केलेल्या अन्यायांमुळे खवळून उठणारे मानवी मन आपण तसल्याच प्रकारचा अन्याय करायला कचरेल असे नाही. एका विहिरीवर आपल्याला पाणी भरू दिले जात नाही, आपण माणूस असून आपणांला तुच्छतेने वागवले जाते, या मध्यावर संतापाने चर्चा करणारा माणस प्रामाणिक असतो. पण तो कितीही प्रामाणिक असला, तरी स्वतःच्याच कुटुंबातील स्त्रियांना समतेने वागवीलच, याची खात्री नसते. जातीची बंधने मोडली पाहिजेत, यावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवणारा माणूस आपल्या जातीची बंधने मात्र सोडण्यास तयार नसतो. एकटी'सारख्या एकांकिकेत हाच संघर्ष, पाहता पाहता वेगवेगळ्या पातळीवरून व्यक्त होताना दिसेल. दूर गावी देऊन आपल्या मुलीचे अकल्याण करण्यास तयार नसलेली, तिच्या सुखाची काळजी घेणारी आई या तिच्या काळजीपोटीच आपल्या भावाशी भांडण करायला तयार असते, पण महाराच्या मुलीने मांग मुलावर प्रेम करावे, हे मात्र तिला मान्य नसते. चुकली असली तरी आपलीच भाची आहे, तिचे लग्न लावले पाहिजे, अशी जबाबदारी मामाला वाटते; पण असली पोरगी आपली सून व्हावी, असे मात्र त्याला वाटत नाही. सवर्णांपैकी एखाद्या मुलाने तिच्या अंगावर हात टाकला, तर तो सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न बनवून या मुद्द्यावर सार्वजनिक लढाई करायला अनेक जण तयार आहेत; पण ज्या समता-स्वातंत्र्यासाठी हे वीर लढू इच्छितात, ते स्वातंत्र्य मात्र त्या मुलीला द्यायला तयार नसतात. तोंडाने समतेची आग्रही भाषा बोलणारे प्रत्यक्षात पुन्हा एकदा आपापल्या जातींचा आणि परंपरेचा अभिमानच जतन करीत आहेत आणि जे आपले व्यक्तिमत्त्व स्वतंत्रपणे समृद्ध करू इच्छीत आहेत, त्यांच्या आड स्वातंत्र्याचा जयघोष करीत परंपरावाद रंगरूप बदलून उभा आहे.

१८६ / रंगविमर्श