पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एका रचनेत हाताळण्याची क्षमता प्रा. भगत यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात साधलेली आहे, हेच या एकांकिकांचे महत्त्वाचे यश होय. ज्या अन्यायाच्या निषेधार्थ हे लिखाण उभे आहे, त्या अन्यायाचा निषेध करताना कुठेही तोल जाणार नाही, याची काळजी घेण्यात या एकांकिका बव्हंशी यशस्वी झालेल्या आहेत. दलित साहित्यात अतिशय अभावाने जाणवणाऱ्या दोन जाणिवा या एकांकिकांमध्ये अतिशय प्रभावी ठरलेल्या आहेत.
  ज्या सामाजिक अन्यायाविरुद्ध आपण झगडू पाहतो, ती अमानुष आणि निर्दय अशी घटना जितकी अमानुष आहे, तितकीच ती अनेकपदरी आणि गुंतागुंतीची असते. आपण जी समस्या हाताळतो आहोत ती अनेकपदरी, गुंतागुंतीची समस्या आहे, याचे भान या एकांकिकांमध्ये सतत बाळगलेले आढळते. ही गुंतागुंत समजून घेण्याच्या प्रयत्नात समजूतदारपणा वाढतो, त्यामुळे रणभूमीच्या आवेशाला काही मर्यादा पडतात. समतेच्या या युद्धात लढण्याचा आवेश टिकावा, म्हणून समजूतदारपणा गमावून आपण स्वतःच साचेबंद आणि एकपदरी व्हावयाचे काय? या प्रश्नाचे सर्वमान्य उत्तर देता येणार नाही. कारण आपला समजूतदारपणा गमवावा, ही माणसाची प्रवृत्ती नसते आणि व्यापक संघर्षात युद्धाला बाधक ठरेल असा समजूतदारपणा टिकवावा, वाढवावा, असे रणभूमीवरच्या सैनिकाला तर मुळीच वाटत नसते.

प्रत्यक्ष प्रश्न सोडवणे हे ललित लेखनाचे काम नव्हे
  आवेश चढता-वाढता ठेवावा, की समजूतदारपणा वाढवीत न्यावा? या प्रश्नाचे उत्तर जे लढाईत प्रत्यक्ष गुंतलेले आहेत, त्यांना देता येणे फार कठीण असते. प्रा. दत्ता भगत यांनी स्वतःपुरते या प्रश्नाचे उत्तर या लिखाणात देऊन टाकले आहे. त्यांचे उत्तर असे आहे की, ललित वाङ्मयाच्या कक्षेत मानवी मनाच्या संदर्भात प्रश्नांची गुंतागुंत समजून घेणे आणि या गुंतागुंतीकडे लक्ष वेधणे, याला लेखक महत्त्व देतो. ललित वाङ्मयाच्या स्वरूपात असणारा हा समजूतदारपणा जीवनाच्या संघर्षात असणारा समतेचा जो आग्रह त्याच्याशी विसंवादी नसून सुसंवादीच आहे, असे लेखकाला वाटते. प्रत्यक्ष जीवनातील प्रश्न सोडवणे हे ललित वाङ्मयाचे काम नव्हे. ललित वाङ्मयाला मनोवृत्ती निर्माण करूनच थांबणे भाग आहे आणि मनोवृत्तींची स्थिर जडणघडण

आवर्त / १८५