पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे; मुख्य गुन्हेगारी या माणसाच्या मागे असणाऱ्या कैक शतकांच्या आदरणीय ठरलेल्या परंपरेची आहे. ही धर्मपरंपरा आणि तिची प्रतिष्ठा हा मख्य शत्रू असल्यामुळे, शतकांच्या परंपरेला नकार देणे, हे दलित साहित्याचे एक महत्त्वाचे रूप आहे. म्हणून दलित साहित्य एका बाजूने विद्रोही साहित्य आहे, तर दुसऱ्या बाजूने परंपरा नाकारणारे साहित्य आहे. . .

नाटक अजून हाताळता येत नाही
  मानसिक क्षोभ, विद्रोह आणि नकार या जाणिवांनी प्रभावित झालेले मन तटस्थ असण्याची शक्यता कमी असते आणि कलात्मक अंतर निर्माण होण्यासाठी आवश्यक असणारी ही तटस्थता जोपर्यंत आत्मसात करता येत नाही, तोपर्यंत नाट्याचे क्षेत्र समृद्ध होणे कठीण असते. सगळ्याच ललित वाङ्मयात कलात्मक अंतराचा प्रश्न महत्त्वाचा असतो. कवितेत कवी बोलू शकतो, कथा-कादंबरीत लेखक निवेदन करू शकतो, घडणाऱ्या घटनांचे खुलासे आणि त्यांवरील भाष्य यांना अवकाश असतो पण नाट्याचे क्षेत्र याहून निराळे असते. तिथे लेखकाला बोलता येत नसते. नाटकात जे काही बोलले जाईल, ते नाट्यातील व्यक्तींना बोलणे भाग असते. म्हणून या क्षेत्रांतील कलावंत-निर्मात्याला फार मोठ्या प्रमाणात तटस्थ राहावे लागते. ही तटस्थता साधली नाही आणि नाट्यांतर्गत व्यक्तींच्या तोंडून नाटककारच बोलू लागला, तर ते नाटक ऊरबडवे आणि नकली होऊन जाते. नाट्याऐवजी तिथे व्याख्याने येतात. क्षोभाच्या ऐन मध्यावर उभ्या असणाऱ्या दलित साहित्यिकांच्या पहिल्या पिढीला अजून नाटक फारसे प्रभावीपणे हाताळता येत नाही, याचे कारण हे आहे.

गुंतागुंतीचे भान
  ललित वाङ्मयाचे सर्व क्षेत्रच परस्परविरोधी ताणांनी बनलेले असते. नाटककार ज्या व्यक्ती निर्माण करतो, त्या व्यक्तींशी काही प्रमाणात त्याला समरस व्हावेच लागते. या समरसतेशिवाय त्या व्यक्ती स्वतःच्या पद्धतीने बोलू शकणार नाहीत. नाटककाराला तटस्थही राहावे लागते आणि समरसही व्हावे लागते. तो आपल्या क्षोभाला नाट्यरूप देणाराही असावा लागतो आणि रसिकांच्यासमोर नाट्य ठेवून आपण निराळाही राहणारा असावा लागतो. हे परस्परविरोधी ताण

१८४/ रंगविमर्श