पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण १२ वे





आवर्त



  माझे मित्र प्रा. दत्ता भगत यांच्या 'आवर्त' या एकांकिका-संग्रहास हा प्रस्ताव लिहिताना मला अतिशय आनंद होतो. प्रा. दत्ता भगत यांच्या नावे एक प्रकाशन पडते आहे, हा तर आनंदाचा भाग आहेच, पण तो व्यक्तिगत खाजगी स्वरूपाचा आहे. मराठीत गेल्या एक तपापासून जे दलित साहित्य विकसित होत आहे, त्या साहित्यसंभारात कविता आणि कथा ज्या जोमाने निर्माण होत आहे, त्या जोमाने नाट्यवाङ्मय नाही. दलित साहित्याच्या क्षेत्रातील नाट्य वाङ्मयाची उणीव काही प्रमाणात हा एकांकिका-संग्रह भरून काढील, असा मला विश्वास वाटतो. नाट्याच्या बाजूनेही क्रमाक्रमाने दलित साहित्य समृद्धीकडे वाटचाल करीत आहे, ही अधिक आनंदाची आणि साहित्यशास्त्रदृष्ट्या महत्त्वाची अशी बाब आहे.

दलित साहित्य-विद्रोही व परंपरा नाकारणारे
  दलित साहित्यातील जाणिवेचा मूलभूत धागा आणि मध्यवर्ती प्रवाह सामाजिक अन्यायाविरुद्ध विद्रोह आणि आक्रोश हा आहे. एका बाजूने एका क्षुब्ध मनःस्थितीतून हे वाङ्मय निर्माण होत असल्यामुळे त्या वाङ्मयाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात संतप्त लेखकांच्या लिखाणाचे आहे. पण हा क्षोभ केवळ वर्तमानकाळात आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि तो अन्याय करणाऱ्या व्यक्तींविरुद्धच नाही. वर्तमानकाळात ज्यांना अवहेलना भोगावी लागते, त्यांच्या मनात ज्यांच्यामुळे हा अपमान होतो, त्यांच्याविषयीची चीड साठलेली असणे स्वाभाविक आहे; पण आपल्यावर अन्याय करणारा समोरचा माणूस हा मुख्य गुन्हेगार नसून तो आनुवंशिक व साहाय्यकारी असणारा क्रमांक दोनचा गुन्हेगार

आवर्त / १८३