पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होते. सर्व विनोद गंभीर होतो. किंबहुना असेही म्हणता येईल की, गंभीर हे गंभीर असते म्हणूनच विनोदी होते. ही विलक्षण किमया आपल्याला 'हलाहल' सारख्या एकांकिकेत घडलेली दिसते, म्हणूनच या एकांकिकेचा नायक गुरुदेव हा गंभीर मार्गदर्शक आणि थिल्लर विदूषक अशा दोन्ही पातळीवर एकाच वेळी वावरत असतो. त्याच्याविषयी राजाच्या मनात अतीव आदर आणि कमाल तुच्छता दोन्ही एका वेळी दिसते. आपल्याला प्रश्नांची उत्तरे माहीत नाहीत तरीही आपण मार्गदर्शन करू शकतो असा गुरुदेवाचा दावा आहे. माणूस हा जन्मजात मूर्ख असतो असे राजाचे मत आहे आणि हे अखंड सत्य आहे असे गुरुदेवांचे मत आहे. आणि तरीही मंथन चालू आहे. मंथनातून हलाहल निघाले तरी आशा चालू आहे. प्रथमदर्शनीच विसंवादी वाटणाऱ्या दोन पातळ्या एकजीव करून दिलीप परदेशींनी आपल्या सामर्थ्याचा नवीन प्रत्यय दिलेला आहे.
  सतत गतिमान असणारे, तरी कुठेच न जाणारे विलक्षण संवाद. सर्व वैफल्य समजून घेणारी तरी विफल नसणारी मनोवृत्ती, मानवी मनाची गुंतागुंत समजावून घेण्याची धडपड करतानाच त्यातील एका पातळीनंतरच्या रहस्याला मान्यता देणारी सुजाणता परदेशींच्या ठिकाणी विलक्षणपणे एकत्र आलेली आहे. म्हणूनच, या सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणाऱ्या एकांकिकाकाराने फार मोठ्या आशा निर्माण केलेल्या आहेत, फार मोठ्या शक्यता दाखवून दिलेल्या आहेत, असे मला वाटते.

१८२ / रंगविमर्श