पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हलाहल
  अशीच अजून एक समर्थ एकांकिका 'हलाहल' ही आहे. फार प्राचीन काळी मेरू पर्वताची रवी आणि वासुकीचा दोर करून सुरासुरांनी समुद्र घुसळलेला होता. त्यातून हलाहल बाहेर पडले होते. ही हलाहलाची एक परंपरेने चालत आलेली पुराण-कथा आहे. आपणही वर्तमानकाळात सबंध समाज विविध मार्गांनी घुसळून काढीत आहोत. शतकानुशतके हे घुसळण्याचे काम चालू आहे, तरीही त्यातून अजून अमृत बाहेर पडलेले नाही म्हणून समाजमंथन थांबत नाही आणि मंथन चालू आहे म्हणून हलाहल बाहेर पडण्याची शक्यताही गृहित धरली पाहिजे. असे हलाहल जरी बाहेर पडू लागले तरी घुसळणे चालूच ठेवावे लागते, यातूनच एक दिवस अमृत बाहेर पडेल अशी आशा आहे. असे हे हलाहलाचे प्रतीक आहे आणि ते वग आणि तमाशा यांच्याशी मिळत्याजुळत्या आकारात लेखकाने मांडलेले आहे. एक अतिशय गंभीर आशय, आशयाचे गांभीर्य न गमावता, खेळकर आणि हलक्याफुलक्या पातळीवर रंगविणे हे कौशल्याचे काम आहे. अशा वेळी वगनाट्य हे पूर्णपणे वगनाट्य रहत नाही. कारण त्यातील विनोद हा खेळकर न राहता अधिक जहरी, विषारी होत जातो. ते गंभीर नाटकही राहत नाही. कारण ते सारखे स्थूल विनोदांनी आपल्याला अधिक थिल्लर होण्याला उद्युक्त करीत असते. वगनाट्यात कथानक फारसे महत्त्वाचे नसतेच. त्यातील संवाद सुटे आणि सैल असतात. कथानकाची गती चाल ठेवण्यासाठी हे संवाद नसतातच आणि गंभीर नाटकात सगळेच संवाद क्रमाने एका उद्देशाच्या दिशेने सरकत असतात. वगाच्या रचनेत सगळेच संवाद उथळ व थिल्लर असतात. गंभीरपणे ज्याला विचारात घेतले पाहिजे अशी व्यक्तीच नसते आणि गंभीर नाटकात प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा असा अस्वस्थ करणारा अर्थ असतो. गंभीर नाटक अगर एकांकिका आणि वगनाट्य या दोन बाबी परस्परभिन्न पातळीवरच्या, परस्परभिन्न दिशेने मनाला खेचणाऱ्या असतात. त्या एकत्र करणारा, दोन्हीतीलही कलात्मकता गमावतो आणि एक विजोड, बेंगरूळ अशी गोधडी हास्यास्पदपणे जुळवून सिद्ध करतो. एखादा समर्थ कलावंत या दोन्ही पातळ्या एकत्र करणारी अशी सलग, स्वयंभू तिसरी पातळी निर्माण करतो आणि तिच्यावर नाट्याची एकात्मता साधतो. अशा वेळी सर्व गांभीर्य हास्यापद

फिनिक्स / १८१