पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाजूने नाकारणाऱ्या आणि दुसऱ्या बाजूने नवीन स्वप्ने रचणाऱ्या आणि ती रचताना, वंचना झालेल्या प्रौढेचे हे चित्र आहे. या गुंतागुंतीचे हळुवार आणि नाजूक चित्रण हा या एकांकिकेचा एक भाग आहे.
  दुसऱ्या पातळीवर जर आपण पाहिले तर खरोखरच ही मुलगी प्रेमात तरी पडली आहे काय? याचीही शंका यायला अवकाश आहे. तिने निवडलेला प्रियकर तिच्याहून एक-दोन वर्षांनी धाकटा आहे. तो श्रीमंतही नाही, फारसा पगारदारही नाही. तिचे मत असे आहे की तो स्वभावाने हळवा आहे. दिसायला सामान्य आहे. आई विचारते, या सामान्य दिसणाऱ्या आणि कुबड असणाऱ्या माणसाविषयी तुला प्रेम तरी केव्हा वाटले? मुलगी सांगते, तो सर्वांच्या चेष्टेचा विषय असल्यामुळे मला त्याची दया वाटली. हा प्रियकर कवी आहे, पण त्याची एकही कविता हिला कधी आवडलेली नाही. कुबडातून बगळ्यासारखी वर येणारी मान हीच तिला चटकन आठवते. तो हिला लग्नाबद्दल विचारतो, ही चटकन होकार देते. दयेचे प्रेमात रूपांतर झाले आहे की नायिकेने आधारासाठी कोणता तरी पुरुष निवडावयाचा म्हणून हा निवडला आहे, याचीही शंका यावी असे तिचे वागणे आहे. वात्सल्य, दया, प्रेम, कीव, आसक्ती, पुढाकार, शरीराची ओढ, असे सर्व धागे इथे एकात एक गुरफटलेले आहेत. तिने त्याला शरीरही देऊन टाकले आहे, पण या शरीराच्या दानाला प्रेमाच्या उत्कट क्षणाला बळी पडण्याचे रूप नाही. उलट तिला ते सहज आणि स्वाभाविक वाटते. त्याच्यापासून दिवस गेलेले असूनसुद्धा, लेकीचे म्हणणे असेच आहे की हे प्रेम वगैरे काही नाही. त्यालाच आपली अधिक गरज आहे, असा तिचा विश्वास आहे. आणि तो येत नाही त्यामुळे ती उदासही झालेली आहे. अजून एक भ्रम संपलेला आहे. ही दुसऱ्या पातळीवरची गुंतागुंत आहे आणि लग्नाशिवाय गरोदर राहिलेली ही मुलगी मातृत्वासाठी आसुसलेल्या न जन्मलेल्या मुलाची आणि म्हाताऱ्या आईचीही समजूत घालते आहे आणि ही सगळी गुंतागुंत एका व्यक्तिमत्त्वात सुसंगत झाली आहे. एकाच वेळी वास्तववादी आणि स्वप्नाळू, उदास आणि भेसूर, उल्हसित आणि विफल अशा नानाविध पातळ्यांवर लीलया संचार करणारी समर्थ एकांकिका म्हणजे दिलीप परदेशींच्या व्यक्तिमत्त्वात दडून असलेल्या प्रचंड सामर्थ्याची साक्ष आहे.

१८० / रंगविमर्श