पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गमावले आहेत. प्रेमापोटी, स्वस्तात बैल विकायला तयार नसणाऱ्या या माणसाने भुकेपाटी आपला बैलही कापून खाल्लेला आहे. बैराग्याच्या झोळीत असणारी सर्वच भाकर एकट्या आपल्याला खाण्यास मिळावी यासाठी ही माणसे एकमेकांची डोकी फोडायला तयार होतात आणि तरीही घनघोर निराशेच्या या विफल वातावरणात आपल्या पोटातील भूक सांभाळीत ते मरणाऱ्या कुत्र्याचे एक पिल्लू सांभाळण्यासाठी घेतात. भुकेच्या दडपणाखाली माणसाचा पशू कसा होतो आणि त्याही दडपणातून वेगवेगळी रूपे घेऊन त्याचे माणूसपणच पुन्हा उफाळून वर कसे येऊ लागते, याचे चित्र या एकांकिकेत आहे. माणूस हा पुतळा स्फटिकासारखा, घडीव आणि आरशासारखा नितळ नाहीच. ती एक गुंतागुंतीची रचना आहे. ही गुंतागुंत कधी माणसाला भोवतालच्या उद्ध्वस्ततेत आशेची खूण दाखवते, कधी ही गुंतागुंत सर्व प्रयत्नांचे वैफल्य दाखवते. परदेशी जेव्हा मानवी मनाच्या गुंतागुंतीचा शोध घेऊ लागतात, तेव्हा त्यांचे सामर्थ्य अधिक प्रकर्षाने जाणवू लागते.

आवडलेल्या एकांकिका
  या संग्रहातील मला सर्वात जास्त आवडलेल्या दोन एकांकिकांच्याविषयी काहीतरी सांगितलेच पाहिजे. त्यांपैकी एक ‘सेलिंग ऑन दि क्लाउड्स्' ही आहे. तिच्यातील नायिकेची रचना आणि तिच्या मनाची गुंतागुंत अनेक पातळीवर समजून घेण्याजोगी आहे. आपली आई अजून स्वपाळूच आहे. आपण निराशेचे घोट गिळीत अत्यंत वास्तववादी झालेलो आहो, असा या जाणत्या मुलीचा दावा आहे. 'खरी न होणारी खोटी स्वप्नं बघायचं आपली आई सोडणार तरी केव्हा?' हा मुलीचा प्रश्न आहे. पण याचा अर्थ तिची स्वप्नसृष्टी संपलेली आहे असा नाही. मुलीने आपली स्वतःची एक नवीन स्वप्नांची दुनिया उभी केलेलीच आहे. आपण अकरा-बारा वर्षांच्या होतो तेव्हा एका मुलावर आपले प्रेम होते याच्या आठवणी तिने आपल्या मनात तिसाव्या वर्षीसुद्धा जतन केलेल्या आहेत. या उतारवयात आपले लग्न होण्याची शक्यता नाही हे आईला पटवून देण्याचे काम चालू असतानाच ही मुलगी स्वतःचा नवा प्रियकर शोधून आपले लग्न जुळवते आहे. जवळ-जवळ तिने ते जुळविले आहे. आपली आई भोळी, आपण शहाण्या असे म्हणत ती स्वतः फसलेली आहे. आपल्या जीवनातील स्वप्ने एका

फिनिक्स/ १७९