पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अभ्यासक या नात्याने ही एकांकिका, एकपदरी भाबडी व स्थूल आहे हे मी नोंदवू इच्छितो. समाजाचे दायित्व मानणारा एक कार्यकर्ता म्हणून परदेशींचे हे अपयशसुद्धा, मला कलावंत या नात्याने त्यांना आलेल्या यशाइतकेच महत्त्वाचे वाटते हेही नोंदविणे भाग आहे. कलात्मक सिद्धी मिळो अगर न मिळो, अपप्रवृत्तींच्या विरुद्ध धैर्याने उभे राहणे, त्यांचा निषेध करणे हे माणूस म्हणून आपले कर्तव्य आहे. परदेशींच्याविषयी वाटणारे हे ऋण मी नाकारणार नाही.

सप्तमस्थानातील चंद्र
  'सप्तमस्थानातील चंद्र' या एकांकिकेत भविष्य आणि ज्योतिष यांच्या अभ्यासात रमलेल्या आणि परस्परांवर गाढ प्रेम असलेल्या वृद्ध दंपतीचे चित्र काढलेले आहे. त्यांच्या एकमेकांना सोडून जाण्याच्या पद्धतीसुद्धा परस्परांची जीवने किती संलग्न झालेली आहेत आणि एकजीव झालेली आहेत याचाच पुरावा देतात. म्हातारपणी शरीरे पूर्णपणे थकून गेल्यानंतर सुद्धा आपल्या तरुणपणाच्या शृंगारस्मृती पुन्हा एकदा जागे करणारे हे वृद्ध जोडपे आहे एकीकडे आणि 'इनोसंट' मधील आपला पाय गमावलेला व म्हणन लंगडा झालेला, यामुळे तरुणपणीच एका बाजूने अगतिक व म्हातारा झालेला माणूस दुसरीकडे. समोरासमोर ठेवून ही दोन्ही चित्रे पाहण्याजोगी आहेत. दोन्हीही माणसे आहेत. एक तरुणपणी पाय गमावून अगतिक झालेला आणि प्रेयसी गमावून विकल झालेला तरुण आहे, जो स्वप्न गमावल्यामुळे क्रूर व विकृत झालेला आहे आणि या विकृतीची त्याला जशी लाज आहे, खंत आहे, तसेच या विकृतीचे त्याला लडिवाळ कौतुकही आहे. विकृतीचे समर्थन, तिचे कौतुक आणि तिची लाज या भूमिकेत आलटून पालटून शिरणारा तरुण काय आणि मुलगा गमावून एकाकी झालेल्या म्हाताऱ्याने सगळ्या जगाला क्षमा करून आपल्या भूतकाळाच्या कोषात साठलेले सुख पुन्हा-पुन्हा आठवून पाहण्याची धडपड करणे काय, हे गुंतागुंतीच्या मानवी मनाचे विलक्षण असे आविष्कार आहेत.

फिनिक्स
  अशीच काही चमत्कारिक माणसे आपल्याला 'फिनिक्स'मध्ये दिसतात. दुष्काळ आणि रोगराईत उजाड गाव झाल्यामुळे त्यांनी आपले सर्व नातेवाईक गमावले आहेत. दुःखच इतके उत्कट व पाठोपाठ आहे की त्यांनी आपले अश्रूही

१७८ / रंगविमर्श