पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पण जे घडले आहे त्याचे रूप असे आहे.
  एक होता मुलगा. स्वभावाने उमदा, दिसायला चांगला, गुणाने उत्तम, स्वभावाने चांगला आणि भावनाप्रधान व सात्त्विक. हा मुलगा अभ्यासात जितका हुशार तितकाच कलाप्रेमात रसिक. या उमद्या मुलावर तितकीच बुद्धिमान, गुणवती आणि सज्जन अशी एक मुलगी प्रेम करू लागली. काही मुले द्वाड होती. गुंड, दुष्ट, बेजबाबदार आणि मठ्ठ होती. ती जितकी मठ्ठ होती तितकीच दुष्ट होती. या दुष्ट मठ्ठ पोरांनी शहाण्या सज्जन पोराचा फार फार छळ हो केला ! अरेरे ! बिचारा त्यामुळे वेडा की हो झाला ! हे 'आर फ़ॉर रॅगिंग' चे कथानक आहे. आता या कथानकात शिल्लक काय राहिले? एका दयाळू मानसिक उपचार-तज्ज्ञ डॉक्टराने रमेशला पुन्हा एकदा सुधारून चांगले करावे. हा डॉक्टर शोधून आणण्याचे काम जर प्रियाने केले तर प्रिया आणि रमेश यांचे लग्न करून शेवट सुखान्त करताच येतो. नाही तरी सर्व दुष्टांना रस्टिकेट करणे आणि प्रियाने चंद्रच्या तोंडात मारणे असा काव्यात्म न्याय या एकांकिकेत आहेच. जिथे दुष्ट माणसे दुष्टच असतात आणि राहतात, त्यांच्या दुष्टपणाला कोणते व्यक्तित्व नसते, जिथे सज्जन माणसे सज्जनच असतात या एकेरी पातळीवर आगाऊ केलेल्या अंदाजाप्रमाणे सुरळीतपणे जाणारे आणि सुखरूप शेवटाला पोचणारे कथानक काहींना आवडते, काहींना आवडत नाही. मला आवडत नाही. याला इलाज नाही. माणसाविषयी निश्चित मत बनवून, त्यांचा निश्चित गट ठरवून रेखीवपणे रचलेली रचना मला आवडत नाही.
  प्रा. दिलीप परदेशी यांनी ही एकांकिका अशीच का लिहिली हे मी समज शकतो. बुद्धिमान आणि उमलणाऱ्या अशा कर्तृत्वशाली मुलांचा संपूर्ण सत्यानाश या रॅगिंग प्रकरणामुळे झालेला आहे. त्याविषयी परदेशींना खरीखरी चीड आणि खराखुरा संताप आहे. कारण हा उमद्या मुलांचा नाश ही राष्ट्रीय हानी आहे. गुंडांच्याविषयी त्यांच्या मनात कोणतीही सहानुभूती नाही. वाचकांच्या मनात या गुंडांच्या विषयी तिरस्काराशिवाय दुसरे काहीही निर्माण होऊ नये अशी परदेशींची इच्छा आहे. विद्यार्थ्यांच्यावर मनापासून प्रेम करणारा एक प्राध्यापक म्हणून मी परदेशींशी शंभर टक्के सहमत आहे. चीड ही प्रचाराच्या प्रेरणेच्या मागे असतेच. तिची धार बोथट होऊ न देता वाङ्मयाला कलेची समृद्धी कशी आणता येईल याचे सोपे उत्तर कुणाजवळ नाही. वाङ्मयाचा एक

रं....१२
फिनिक्स / १७७