पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आर फॉर रॅगिंग
  'आर फॉर रॅगिंग' ही मला अगदीच न आवडलेली एकांकिका आहे. प्रश्न फार गंभीर आणि मोठा आहे. त्या गंभीर व्यापक प्रश्नाचे सर्वांगीण दर्शन या एकांकिकेत घडत नाही अशी तक्रार मी करणार नाही. रॅगिंग हा विशिष्ट प्रकारच्या समाजव्यवस्थेतून जन्माला येणारा भयावह प्रकार आहे. ज्यांना शिकण्याची इच्छा नाही, ज्यांची ज्ञान स्वीकारण्याची कुवत नाही, पण ज्यांना अत्यंत सुखाने आयुष्य वाया घालविण्याची संधी उपलब्ध आहे, त्यांच्या जीवनातील विकृती रॅगिंगच्या रूपाने उफाळून वर येते. कोणत्याही प्रकारच्या दायित्वाशिवाय ज्यांना सुरक्षितता व स्वातंत्र्य प्राप्त होते ते क्रमाने विकृत होत जाणारच. हा दोष विसाव्या शतकाचा नाही. हा दोष मानवी रचनेचा आहे. डेस्माँड मॉरिस याचे तर असे मत आहे की, दायित्वाशिवाय सुरक्षितता जर दिली गेली तर प्राणिजगतसुद्धा नवनव्या विकृतीच्या आहारी जाते. जुन्या जगात सुरक्षितता मिळाल्यानंतर जहागीरदार, संस्थानिक आणि राजेरजवाडे निष्कारणच क्रूर होत, उद्दाम, बेजबाबदार असे होत, त्यांच्यातील विकृतींना सहस्र बीभत्स आकार प्राप्त होत. नव्या काळात यापेक्षा वेगळे होण्याची शक्यता नाही. रॅगिंगचा प्रश्न हा एकूण शिक्षणव्यवस्थेच्या आणि समाजव्यवस्थेच्या गाभ्याशी जाऊन भिडणारा प्रश्न आहे. या प्रश्नाचे अक्राळविक्राळ रूप परदेशींच्या एकांकिकेत दिसत नाही ही माझी तक्रार नाही. एखाद्या समस्येचे सर्वांगीण चित्रण करण्याची जबाबदारी कलाकृतीने स्वीकारावी अशी माझी अपेक्षा नाही.
  या एकांकिकेतील संवाद अधिक गतिमान, वक्तृत्वपूर्ण, खटकेबाज झालेले आहेत, त्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीला अशा प्रकारचे संवाद उतरण्याचा संभव जास्त आहे हे मला मान्य आहे. या एकांकिकेचा प्रयोग अधिक रंगतदार होईल. त्यामुळे महाविद्यालयातून तिचे प्रयोग संख्येने जास्त होतील अशी अपेक्षाही करायला हरकत नाही. म्हणून या एकांकिकेचा रंगतदारपणा हा माझ्या तक्रारीचा भाग नाही. माझी तक्रार यापेक्षा निराळी आहे. या एकांकिकेची रचना ज्या पातळीवरून साकार झालेली आहे, ती पातळी हमखास प्रयोगात यशस्वी होण्याचा हुकमी विचार करणारी पातळी आहे. ती पातळी कलात्मक वाङ्मयाच्या रचनेची नाही. हे जाणीवपूर्वक लेखकाने केले हा माझा आरोप नाही,

१७६/ रंगविमर्श