पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकांकिकांची वर्गवारी करून आपण यांचे अंतरंग फार समजून घेऊ शकू असे नाही. केवळ वर्गवारीच करायची तर यापेक्षा निराळ्या प्रकारानेसुद्धा करता येईल. प्रतीकांचा वापर करणाऱ्या एकांकिका म्हणून तीन एकांकिका दाखविता येतील. मी अजून एक वर्गीकरणाचा प्रकार सुचवितो. ज्या ठिकाणी लेखकाचा स्वप्नाळू भाबडेपणा प्रभावी झालेला आहे असा काही भाग आहे आणि जिथे लेखकाने मानवी जीवनातील स्वप्नाळ भाबडेपणाचे अधिक खोलवर जाऊन दर्शन घेतले आहे असा काही भाग आहे. एकातून वाङ्मयाच्या उणिवांचा जन्म होतो, दुसऱ्यातून वाङ्मयाच्या सामर्थ्याचा जन्म होतो.
  प्रत्येक एकांकिका ही एक स्वतंत्र कलाकृती असते आणि सर्वच कलाकृती सारख्या प्रमाणात यशस्वी होतील याची शक्यता नसते. जे एकाला आवडेल तेच दुसऱ्याला आवडेल याची शाश्वती नसते. मला स्वतःला या संग्रहातील दोन एकांकिका अतिशय आवडल्या, पण एक एकांकिका मुळीच आवडली नाही. जी एकांकिका मला आवडली नाही ती सर्वांचीच नावडती होईल असे मानण्याचे कारण नाही; पण जे मला आवडते ते का आवडते हे सांगण्याचा आणि जे आवडत नाही ते का आवडत नाही हे सांगण्याचा माझा हक्क हा अबाधित राहिला पाहिजे. कारण ज्या वेळी मी एखादी एकांकिका मला मुळीच आवडली नाही असे म्हणतो त्या वेळी माझ्या मनात काही कारणे असतात. या कारणांचा वाङ्मयीन मूल्यमापनाशी किती जवळचा संबंध आहे ते सांगता येत नाही. प्रथम मला जे अगदी आवडले नाही त्याविषयी सांगतो, नंतर जे अतिशय आवडले त्याहीविषयी सांगतो, पण हे सांगण्यापूर्वी एक गोष्ट मी प्रा. परदेशींना केवळ वयाच्या अधिकाराने सांगू इच्छितो की, ज्या प्रकारचे लिखाण समीक्षक आवडले असे म्हणतील त्या प्रकारचे लिखाण मुद्दाम करण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला तर ते सफल होईलच असे नाही. कलावंताने आपल्या अनुभवाशी प्रामाणिक राहावे. त्यातून जे शिल्प साकार होईल त्याविषयी बरे-वाईट म्हणण्याचा समीक्षकांचा अधिकार गृहित धरावा. टीकाकारांच्या सांगण्यानुसार कलावंताने अनुभव घेण्याचा प्रयत्न करू नये. कारण स्वतः टीकाकारांना अनुभव घेणे व त्याच्याशी प्रामाणिक राहणे जमत नसते. ज्यांना ते जमते त्यांनी एकांकिका लिहाव्यात, ज्यांना ते जमत नाही ते प्रस्तावना लिहितील. या वाटणीविषयी आमची कुरकुर नाही, तुमची नसावी.

फिनिक्स/ १७५