पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोणत्या तरी ठराविकाला स्वतःला बांधून घेतलेले नाही आणि बांधून घेतलेले नाही ही चांगली गोष्ट आहे.

धक्कातंत्राचा धोका
  एखाद्या प्रयोगात यश मिळाले की कलावंताला त्यासारखे पुनः पुन्हा लिहिण्याचा मोह होऊ लागतो आणि या मोहातूनच थोडी तंत्राची सफाई आणि पुष्कळसे आशयाचे आवर्त याची कमाई लेखक करू लागतो. काहीजणांच्या कलात्मक धारणाच थोड्या उथळ असतात. विकृतीच्या प्रदर्शनाशिवाय आणि विशिष्ट्य शब्दप्रयोगांनी अधिक प्रेक्षकांच्या, वाचकांच्या नजरेत बोचण्याजोगे, खुपण्याजोगे झाल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही असे काहीजणांना वाटू लागते. असल्या प्रकारचे उथळ प्रयोग जो धक्का रसिकांना देतात, तो धक्का रसिकांचे कलात्मक आकलन समृद्ध करणारा नसतोच; म्हणून या धक्क्याचे तंत्र फार लवकर जुनेपुराणे वाटू लागते. अशा कोणत्याही एखाद्या नकली कलाशून्य प्रवृत्तीच्या आहारी न जाता, पण त्याबरोबरच सोज्ज्वलतेच्या अवाङ्मयीन कल्पनांचा मनावर पगडा बसू न देता दिलीप परदेशी अनुभव घेत आहेत आणि तो व्यक्त करण्याच्या धडपडीत कधी सफल कधी विफल होतात. प्रयोग करणाऱ्या कलावंताने अपयशी होण्याची तयारी मनाने ठेवलीच पाहिजे. अपयशांना घाबरणारा कलावंत प्रयोग करू शकणार नाही.

वर्गवारीच्या तऱ्हा
  या संग्रहात दिलीप परदेशींच्या एकूण सहा एकांकिका संग्रहित करण्यात आलेल्या आहेत. या सहा एकांकिकांच्यापैकी विभागणीच करायची असेल तर दोन सामाजिक प्रश्नांच्यावर आहेत. 'आर फॉर रॅगिंग' या एकांकिकेचा विषय अलीकडे महाविद्यालयांत बळावलेली एक अपप्रवृत्ती हा आहे. 'फिनिक्स' ही अशी दुसरी एकांकिका आहे, तिचा विषय दुष्काळ हा आहे. दोन एकांकिका मनोविश्लेषणावर भर देणाऱ्या आहेत. 'सप्तम स्थानातील चंद्र' ही एकांकिकां वृद्धांचे मन पाहणारी आहे. 'सेलिंग ऑन दि क्लाउड्स' ही एकांकिका एका प्रौढेचे मन सांगणारी आहे. दोन एकांकिका विकृतीचे दर्शन घडविणाऱ्या आहेत. एक वैयक्तिक जीवनातील विकृतीचे चित्रण करते, दुसरी ‘हलाहल' या नावाची एकांकिका सामाजिक जीवनातील विकृतीचे चित्रण करते. अशा रीतीने या

१७४/ रंगविमर्श