पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमी
  प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी यांच्यात अंतर असते; पण काही लोक मानतात तितके हे अंतर जास्त नसते. प्रत्येकच कलाकृतीला काही प्रमाणात आपला श्रोता तयार करावा लागतो. आपला रसिक प्रेक्षक घडवावा लागतो. ज्या प्रयोगांना हे यश येते ते प्रयोग काही काळातच व्यावसायिक रंगभूमीवर ढकलले जातात. ढकलले जातात असे म्हणण्याऐवजी, व्यावसायिक रंगभूमी ते आत्मसात करते असे म्हटले तरी हरकत नाही. कारण व्यावसायिक रंगभूमीवरसुद्धा सगळेच बाजार शोधणारे, धंदेवाईक नसतात. तिथेही आस्थेवाईक कलावंत असतात. सगळीच प्रायोगिक रंगभूमी जाण व आस्था असणाऱ्या कलावंतांनी भरलेली नसते. तिथेही हवसे-गवसे पुष्कळ असतात. जो वाङ्मयप्रकार रसिकांच्या मनात ओढ आणि आस्था निर्माण करतो, तो फार काळ अप्रतिष्ठित राहात नसतो. उद्या कधी काळी एकांकिकांना नाटकांची प्रतिष्ठा आली तर ती परदेशींच्यासारख्या या कलाप्रकाराची, या प्रकारातील स्वयंपूर्णतेची जाण असणाऱ्या लेखकांच्यामुळे येईल, असे मला वाटते.
  प्रा. दिलीप परदेशी यांचे सगळ्यात चांगले वैशिष्ट्य हे आहे की, अजून त्यांनी स्वतःला कुठे बांधून घेतलेले नाही. मानवी जीवनातील सगळे थर आणि सगळ्या तन्हा समजून घेण्यास ते तयार आहेत. ते स्वतः तरुण असल्यामुळे तरुणांचे जीवन तर ते समजून घेतातच, पण प्रौढांचे आणि वृद्धांचेही जीवन समजून घेण्याची त्यांना आस्था आहे. जीवनातील समस्या त्यांना नाकाराव्या वाटत नाहीत, पण या समस्यांच्यापेक्षा माणूस हीच एक समस्या अधिक रहस्यमय आहे, असेही त्यांना वाटते. भाबडा आशावाद त्यांनी जतन केलेला नाही, पण म्हणून अविचल निष्ठेने ते नैराश्य आणि वैफल्य यांचे एकच एक गीत आळवीत बसणार नाहीत. जीवनात विकृती आहे याचे त्यांना भान आहे, पण विकृतीतही त्यांना केवळ विकृती म्हणून रस नाही, तीही त्यांना समजून घ्यायची आहे आणि या समजून घेण्याच्या प्रयत्नात सगळेच आपल्याला समजू शकेल, सगळे समजलेलेच आहे असा त्यांचा दावाही नाही. जे रहस्य अर्धवट समजते आणि अर्धवट गूढच राहते, त्याच्यासमोर, त्या गूढतेसह नतमस्तक होण्यास ते तयार आहेत. म्हणूनच मी असे म्हटले आहे की, अजून दिलीप परदेशी यांनी

फिनिक्स / १७३