पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाऊण तासात आटोपणाऱ्या नाटिकेसाठी तेवढीच किंमत देणे मनातून आवडत नाही. खरे तर असे आहे की ज्या काळी नाटक सात-साडेसात तास चालावे अशी प्रेक्षकांची अपेक्षा असे त्या काळी चार-पाच तास चालणाऱ्या नाटकाच्या जोडीने छोटेखानी नाटके अगर एकांकिका बसवाव्या लागत, त्या वेळ भरून काढण्यासाठीच होत्या. याचा परिणाम असा होतो की, व्यवहार म्हणून व्यावसायिक रंगभूमीचे क्षेत्र एकांकिकेला उपलब्धच होत नाही. प्रायोगिक रंगभूमीवरचे प्रारंभिक अवस्थेतले नट आणि कौतुकासाठी जमलेले प्रेक्षक या दुबळ्या आधारावर एकांकिकेचा प्रपंच चालतो. गॅदरिंगमध्ये थोडक्यात आटोपावे, तीन-चार तासांच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नाटुकले वावरावे त्याप्रमाणे एकांकिका वावरतात. एकांकिकेला नाटकांची प्रतिष्ठा मिळण्याबाबत व्यवसायाच्या व्यावहारिक अडचणी खूप आहेत हे खोटे नसून खरेच आहे.

कलात्मक कारणे
  पण ही बाब इतकीच नाही. या घटनेला काही कलात्मक कारणेही आहेत. एखाद्या नाटकाचा कधी कधी आपण एखादाच अंक बसवतो. पुष्कळदा तर त्या नाटकातील एखादा प्रवेशच बसवला जातो. गडकऱ्यांच्या नाटकातील सुट्या प्रवेशांच्या प्रयोगाची दीर्घ परंपरा आहे. एका सलग कलाकृतीचा एक अंश तोडून आपण जेव्हा पाहतो, त्या वेळी जो अनुभव येतो, तसाच जर एकांकिकेचा प्रयोग पाहताना येऊ लागला तर एकांकिकेला नाटकाची प्रतिष्ठा प्राप्त होणे शक्य नाही. एकांकिका हा तुकडा नव्हे, ती एक सलग स्वयंपूर्ण कलाकृती आहे, असे सांगून भागणार नाही. एकांकिकेचा प्रयोग पाहताना तो प्रत्यय यायला हवा. खेळकरपणे हाताळण्याचे एकांकिका हे खेळणे नव्हे. तो आस्वादकांना सर्व गांभीर्यानिशी विचारात घेणे भाग असलेला एक स्वयंपूर्ण कलाप्रकार आहे याची जाणीव जोपर्यंत एकांकिकेतून होत नाही, जोपर्यंत एकांकिका पाहाताना ती नाटकाचा भाग वाटते किंवा ती वाढवून अधिक प्रभावी नाटक करता येईल असे जाणवते तोपर्यंत एकांकिकेला नाटकाची प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. प्रा. दिलीप परदेशी यांच्या 'सेलिंग ऑन दि क्लाऊड्स', 'हलाहल', 'महाद्वार', 'मश्रूम्स आर ग्रोइंग' यांसारख्या एकांकिका वाचताना असे या रूपकप्रकाराचे स्वयंभू सामर्थ्य जाणवत राहते ही खूण मला आशेची वाटते.

१७२ / रंगविमर्श