पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण ११ वे





फिनिक्स



  ज्या काळात संस्कृत नाट्यवाङ्मय वैभवाच्या शिखरावर होते त्या काळात एकांकिकांना जी प्रतिष्ठा होती ती अजून या वाङ्मयप्रकाराला मिळालेली नाही. भरतनाट्यशास्त्र सरळ नाटकांचे दहा प्रकारांत वर्गीकरण करते. त्या काळातले प्रतिष्ठित व मान्य नाटकप्रकारात, त्यांच्यातील काही रूपकप्रकार पाचहून अधिक अंक असणारे आहेत. काहींची अंकसंख्या तीन-चार आहे, पण काही रूपकप्रकार या एकांकिकाच आहेत. नाटिकेचे अंक चार असतात, प्रकरणिकेचेही चार अंक असतात; पण त्यांना उप रूपकप्रकार समजायचे. उपरूपकांना रूपकांची मान्यता व प्रतिष्ठा नाही. व्यायोग, भाण, उत्सृष्टांक हे असे रूपकप्रकार आहेत की ज्या एकांकिका आहेत, पण त्यांची प्रतिष्ठा मात्र नाटकांच्या बरोबरीने आहे. आधुनिक काळात एकांकिकांचे प्रयोग झाले. पुष्कळदा हे प्रयोग प्रयोग म्हणून सुद्धा यशस्वी झाले, पण एकांकिकांना कधी नाटकाची प्रतिष्ठा आली नाही. आजही ती आलेली नाही.

एकांकिका-प्रायोगिक क्षेत्रच उपलब्ध
  या घटनेची कारणे आपण समजून घ्यायला हवीत. नाटक हा समूहाच्या आस्वादाचा कलाप्रकार असल्यामुळे नाटकासंबंधी विचार अपरिहार्यपणेच अनेकविध पातळीवरून करावा लागतो. यांपैकी एक पातळी व्यवहाराची आहे. नाटकाच्या प्रयोगाच्या मानाने एकांकिकेच्या प्रयोगाला वेळ थोडा लागणार ही गोष्ट उघड आहे. अपवाद म्हणून एखादी एकांकिका नाटकाच्या इतकी दीर्घ लिहून काढता येईल, ते अशक्य नाही; पण तो अपवाद झाला, सामान्य नियम नव्हे. कालावधी कमी असल्यामुळे चार-पाच तासांची सोय पाहणाऱ्या प्रेक्षकाला

फिनिक्स / १७१