पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आरंभापासून सुरू होते. नवे नाटककार आपल्या नायकाचा मृत्यू दाखवीत नाहीत. कारण मृत्यूमुळे नाटकातील एका व्यक्तीचा प्रश्न सुटेल. समाजात उभा असणारा प्रश्न सुटतच नाही आणि नायक तर या समस्येचा प्रतिनिधी. म्हणून नायक मरून चालणार नाही. सधन श्रीमंताची मुलगी नायकाच्या गळ्यात माळ घालते व नायक श्रीमंताचा जावई होतो हेही कुणी मान्य करणार नाही. समाजातील इतक्या बेकारांना उपलब्ध होतील एवढी श्रीमंत माणसे असणार कुठून. म्हणून मग एक चक्र, त्याचा अखंडपणा व एक चक्कर म्हणजे नाटक संपण्याची सोय, या मार्गाने जावे लागते. दाखवायचे ते दाखवून झाल्यानंतर आणि सांगायचे ते सांगून झाल्यानंतर प्रश्न संपत नाही, पण नाटक संपते. नाटककाराने ही जागा व्यवस्थितपणे साधली आहे.

१७० / रंगविमर्श