पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 लायक माणसाला वाव मिळत नाही. प्रामाणिकपणे जगणाऱ्यांना न्याय मिळत नाही. बुद्धिमान माणसाला प्रतिष्ठा मिळत नाही. ही समाजातील सार्वत्रिक तक्रार आहे. आपण एका भ्रष्ट जगात वावरतो आहो ही सार्वत्रिक जाणीव आहे. तोच या नाटकाचा ठसा आहे. हा ठसा वास्तव आहे. सर्व अतिशयोक्ती मान्य करूनही नाटकाचा अनुभव हा जीवनातील वास्तवाचा अनुभव आहे हेच मानावे लागते. वास्तव पाहताना जे जाणवले ते वाचकांच्या मनापर्यंत पोचवायचे असेल तर थोडी अतिशयोक्ती, थोडा भडकपणा ही साधने वापरली जातात. ही साधने वापरावीत काय याचे प्रत्येकाचे उत्तर अभिरुचीप्रमाणे निराळे येणार. हा रुचिभेद आपण मान्य केला पाहिजे.

रूढ अर्थाने शेवट नाही
  या नाटकाबाबत अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे ती म्हणजे या नाटकाला रूढ अर्थाने शेवट नाही. एका ठिकाणापर्यंत आपल्या जीवनाची कथा सांगून झाल्यानंतर नायकाला चक्कर येते. भोवळ येऊन तो बेशुद्ध पडतो. आता सांगणाराच बेशुद्ध पडल्यानंतर पुढे काय करणार? त्यामुळे सर्वांची क्षमा मागून या ठिकाणी नाटक संपवणे भाग आहे. एका बाजूने पाहिले तर हा तंत्राचा भाग आहे. नाटक कुठून सुरू करावयाचे, कसे वाढवावयाचे, कुठे संपवावयाचे याची काळजीपूर्वक आखणी नाटककाराने केलेली असते. या सुनियोजित मार्गानेच नाटक जात असते व संपतेही; पण आरंभ जर मेकअपचे सामान नाही व लिहिलेली संहिता नाही म्हणून तू तुझी कहाणी सांग तेच नाटक असा असेल तर मग इथे हाच चक्कर येऊन पडला; आता काय सांगणार व कोण सांगणार हाच नाटकाचा शेवट असणे स्वाभाविक आहे.

आणखी एक खोच
  पण या तंत्राखेरीज या शेवटात एक खोच आहे. आजच्या सुशिक्षित बेकाराला नोकरी मिळत नाही, स्थैर्य नाही, प्रतिष्ठा नाही, समाधान नाही हे मान्य केले तरी हा शेवट आहे का? हा शेवट नाही. कारण मरणही येतच नाही आणि मरण्याची इच्छाही नाही. या न संपणाऱ्या व्यथा आहेत. त्यांना शेवट नाही. या चक्रातून बाहेर कसे पडायचे हा विचार करताना भोवळ येऊन आपण थांबतो, पण पुढे काय? पुन्हा शुद्ध येते आणि त्यानंतर आपल्या दुःखाचेच चक्र पुन्हा

भग्नमूर्ती / १६९