पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'सुशिक्षित बेकाराची कहाणी
 'भग्नमूर्ती' मधील कहाणी ही स्थूल मानाने सुशिक्षित बेकाराची कहाणी आहे. या कहाणीला अडाणी आणि उद्दाम राजकीय नेते हा एक धागा आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी, हितसंबंधासाठी पडेल ती तडजोड करणाऱ्या स्त्रिया हा दुसरा धागा आहे. सज्जनपणे जगणे अशक्य झाल्यामुळे स्मगलर्सचे गुन्हेगार जीवन जगणारे लोक असाही एक धागा आहे. माणसांच्या सत्प्रवृत्तींच्या चिंध्या उडवणारी न्यायालये हा अजून एक धागा आहे. प्रत्येक धाग्याशी काही माणसे जोडलेली आहेत. समाजात राहणाऱ्या एका माणसाची कहाणी ही त्याची एकट्याची कधी नसते. सर्वांच्या कहाणीशी जोडलेला एक भाग म्हणून एकाची कहाणी असते. याही नाटकातील कथा ही अशीच आहे. मी या कहाणीला एकाच वेळी वास्तववादी व अवास्तव प्रकृतीची कहाणी या दोन्ही पद्धतीने जाणून घेऊ इच्छितो.
  वास्तव हे कधीच अतिरेकी आणि एका पातळीवरचे असत नाही. वास्तव हे रंगशून्य, कडवट, गुंतागुंतीचे असेच असते. सर्वसामान्य सुशिक्षित बेकारांची कथा ही विद्यापीठात फर्स्टक्लास फर्स्ट आलेल्याची नसते. सामान्य सुशिक्षित बेकारांची कथा ही सर्वसामान्य माणसाचीच कथा असते. अतिश्रीमंतांच्या मुलांनी प्रेम करणे व ऐनवेळी बापाचा आग्रह मान्य करून बरोबरीच्या स्थळाशी लग्न करणे ही घटनाही सामान्य जीवनात नेहमी घडणारी नाही. ज्ञानाचा व व्यवहारचातुर्याचा गंध नसणारे मंत्री आणि संस्थाचालक हेही नित्याचे दर्शन नव्हे. राजकीय नेता सज्जन असेलच, निःस्वार्थ असेलच, असे नाही म्हणणे निराळे आणि ही सारी मंडळी अशिक्षित व अडाणी असतात हे म्हणणे निराळे. अशिक्षितपणाचा मुद्दा वास्तववादाचा भाग नव्हे. म्हणजे अतिशयोक्ती करताना इतक्या ठिकाणी आपण वास्तववाद गुंडाळून ठेवला ही यादी अजून लांबवता येईल. स्मगलरांपासून मिलचालकांपर्यंत अनेक घटकांचा उल्लेख करता येईल. खरा मुद्दा वास्तवाच्या पलीकडे जाणारे घटक कोणते त्यांची यादी हा नाही. खरा मुद्दा असा आहे की एका बाजूने तंत्र, नाट्य अधिक वास्तव वाटावे याचे प्रयोग करीत आहे तर दुसऱ्या बाजूने आशय मात्र हे नाटक आहे हे विसरू नका असे सांगत आहे.

१६८/रंगविमर्श