पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पैसे नाहीत. गावात मेकअपची-दुकाने दोन. पैकी एक बंद तर दुसऱ्याचे सामान इतरत्र गेलेले आहे. म्हणून मेकअपचे साहित्यच उपलब्ध नाही. मग करणार काय? शेवटी नाईलाज म्हणून प्रायोगिक नाटक दाखवले जाते. तेही लिहिलेले नाही. एकजण पुढे येऊन स्वतःची कहाणी सांगू लागतो. ती कहाणीच एक नाटक आहे. असा या नाटकाचा आरंभ होतो.
  हा सगळा आरंभ जाणीवपूर्वक या पद्धतीने करण्यात आलेला आहे हे समजून घेतले पाहिजे. एकही गोष्ट वेळेवर होत नाही, योग्य वेळी योग्य माणसे मिळत नाहीत, योग्य सामान मिळत नाही यामुळे सारे जीवनच विस्कळीत झालेले आहे. ही सूचना देण्यासाठी असा आरंभ असतो. माणसे घाईगर्दीत असली की वेळेवर पोचत नाहीत हे तर नाटककाराला सांगायचे असतेच, पण नाटकाचे कथानक मुद्दाम जुळवून लिहिण्याची गरज नाही. माणसे आपले जीवन सांगू लागले तर तेच एक नाटक आहे इतके स्वाभाविक आणि वास्तववादी, गावोगाव दर वेळी घडणारे हे वास्तव आहे असेही सुचविण्याचा हा प्रकार आहे. प्रायोगिक नाटकांच्यामध्ये असणारी अनौपचारिकता वास्तवाचा भास निर्माण करण्यासाठी एक सहेतुक योजना असते. तसे नाटक पडदा वर उचलल्यापासूनच आरंभ झालेले आहे.

वास्तवाचा आभास निर्माण करण्यासाठी तंत्र उपयुक्त?
  नाटकाचा अनुभव कसा असतो व कसा असावा हा नेहमीच एक वादाचा विषय राहिलेला आहे. हे नाटक आहे म्हटल्यानंतर तिथे नट असणार, ती मंडळी पात्र होणार, भूमिका वठवणार. ती त्यांच्या जीवनाची कहाणी मुळी नसतेच. तेव्हा नाटक खोटेच असते, पण प्रयोग पाहताना आपण ते खोटेपण विसरतो. ते सर्व काही खरे आहे असे समजून पाहतो. हे खरे आहे, हे खोटे आहे या दोन्ही जाणिवा नाटक पाहताना असतात. यापैकी पाहतो आहोत ते खरे आहे ही जाणीव गडद करीत नेण्याचे तंत्र प्रायोगिक रंगभूमी अधिक प्रमाणात वापरते. कारण ही वास्तववादी जीवनाची कथा आहे असे त्यांना म्हणावयाचे आहे. वास्तवाचा आभास निर्माण करण्यासाठी हे तंत्र उपयोगी ठरले आहे का हा प्रश्न विचारून त्या नाटकाची यशस्विता ठरवावी लागते.

भग्नमूर्ती / १६७