पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बंधनाच्या त्यागामुळे तुम्हाला अधिक जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागते. बंधनाच्या तुम्ही तुलनेने मोकळे होत असता व क्रमाने बंधने झुगारून देताना तुमची जबाबदारी वाढत जाते. ही वाङ्मय कलेतील प्रथमदर्शनी चमत्कारिक वाटणारी बाब आहे. हा चमत्कारच कलांच्या, वाङ्मयाच्या क्षेत्रातील एक न नाकारता येणारे सत्य आहे. हा मुद्दा नीट समजून घेतला तर या नाटकाकडे अधिक व्यवस्थितपणे पाहता येईल, असे मला वाटते.
  आपण कवितेच्या उदाहरणापासून आरंभ करू. वृत्ताचे नियम पाळून आणि यमकाच्या नियमांचे पालन करून जेव्हा कविता लिहिली जाते त्या वेळी लय आणि नाद यांना वृत्त यमकांचे साहाय्य होते. यमकाचे बंधन सोडले तर भाषेच्या लालित्याची अधिक जबाबदारी घ्यावी लागते. वृत्ताचे बंधन नाही आणि यमकांचेही बंधन नाही अशी मुक्तछंदातली कविता जर आपण लिहीत असलो तर आशयाची अंतर्गत लय आणि प्रतिमांची समृद्धी आपणाला सांभाळावी लागते. नाहीतर कविता मग कविता राहत नाही, ते नुसते गद्य उरते. हा जो नियम कवितेला लागू आहे तोच नियम नाटकालाही लागू आहे. सजावट आणि पडदे, देखावे आणि संगीत यांच्यापासून तुम्ही मुक्त होऊ लागला की तुमचे नाट्य अधिक भावोत्कट आणि जिवंत असण्याची जबाबदारी नाटककाराला घ्यावी लागते. प्रायोगिक नाट्य हे अशा प्रकारे अधिक जबाबदारी स्वीकारून लिहिलेले नाट्य असते. या नाटकाच्या संवादातून जो अनौपचारिकतेचा भास उभा केलेला असतो तो सहेतुक उभा केलेला भास म्हणून समजून घेतला पाहिजे.

नाटकाचा आरंभ
  पडदा वर जातो आणि नाटक सुरू होते हा आपला नाटकाच्या बाबतचा सामान्य नियम आहे. क्षणभर असा भास होतो की हा सामान्य नियम इथे मोडला गेलेला आहे. पडदा वर उचलला जातो त्या वेळी काही माणसे रंगभूमीवर आलेली आहेत, पण नाटकात सहभागी असणारी आणखी काही माणसे अजून आलेली नाहीत. नाटकात काम करणारे नट वेळेवर जमू शकलेले नाहीत. अजून रंगभूमीवरील सेटिंग्ज लावायचे राहिले आहे. नाटक सुरू होण्याची वेळ झालेली आहे. प्रेक्षक खोळंबून राहिलेले आहेत. अशा वेळी धावपळ करीत अजून काही नट हजर होतात. त्यांना बस वेळेवर मिळालेली नाही. रिक्षाने येण्यासाठी जवळ

१६६ / रंगविमर्श