पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण १०वे





भग्नमूर्ती



 कमलाकर देशमुख हे मराठवाड्यातील उदयोन्मुख नाटककार आहेत. 'भग्नमूर्ती' हे त्यांचे एक लक्ष वेधणारे नाटक. नाटक हा वाङ्मयप्रकार इतर वाङ्मयप्रकारांपेक्षा निराळा आहे. तंत्र म्हणून तर तो निराळा आहेच, पण मुळात आपण कबूल करू अगर न करू, आशयाच्या रचनेच्या दृष्टीनेसुद्धा तो निराळा आहे. नाट्याची उभारणी संघर्षावर होते असे आपण मानतो आणि ते खरेही आहे; पण केवळ संघर्ष या कल्पनेमुळे नाटकाची कल्पना संपूर्णपणे उभी राहत नाही. कारण संघर्ष जरी असला तरी नाटकात तो पूर्णपणे संवादांतून उभा करावा लागतो. कादंबरीसारख्या वाङ्मयप्रकारात वातावरणनिर्मितीसाठी निवेदनाचा आधार घेता येतो. आपण अंतर्मनातील द्वंद्वे मनोविश्लेषणाचा आधार घेऊन दाखवू शकतो; पण नाटकात संवाद आणि व्यक्तींच्या वर्तनातून उभा राहणारा प्रसंग यापेक्षा दुसरा आधार नसतो. वर्णनाचे साह्य नाटकाला फार थोडे होते. सगळा भर जर संवादावरच ठेवायचा असला तर केवळ नाटकाचे तंत्र वेगळे असते असे म्हणून भागणार नाही. आशयाची मांडणीच निराळी असते याची नीट जाणीव ठेवावी लागते.

प्रायोगिक तंत्राने सादर
  कमलाकर देशमुख आपले 'भग्नमूर्ती' हे नाटक नव्या प्रायोगिक नाटकांच्या पद्धतीने सादर करीत आहेत. हे प्रायोगिक तंत्र एका बाजूने नाटक सोपे करीत जाते तर दुसऱ्या बाजूने नाटक अवघड करीत जाते. वाङ्मयाच्या आणि कलांच्या क्षेत्रातील ही एक विचार करण्याजोगी घटना आहे. तुम्ही एक एक बंधन झुगारून देऊन मोकळे होऊ पाहता. बंधने झुगारल्यामुळे तुम्ही मोकळे होत नाही. दर

भग्नमूर्ती / १६५