पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपासना केली आहे त्यामुळे बयोची सगळी आदळआपट आणि संताप एखाद्या खोल जलाशयाच्यावर उठणाऱ्या तरंगांइतकाच चंचल आणि मोहक आहे. बयोचा एक गाभा ज्या धातूने भानूंची मूर्ती घडली आहे त्याच धातूचा आहे.

बयो ही ध्येयवादिनीच
  म्हणूनच बयो आपल्या सर्व निरागस प्रांजळपणानिशी, आकांत-आक्रोशानिशी ध्येयवादिनी आहे. ती एकाच वेळी पतीची पत्नी, मुलांची आई, समाजाची सेविका आणि ध्येयवादाची उपासिका आहे. कानेटकर असामान्यांच्या व्यक्तिरेखेचा शोध घेण्यासाठी भानूंना शरण गेले. प्रत्यक्षात त्यांच्या हातून बयोची एवढी भव्य आकृती साकार झाली आहे की, बयो आकाशाप्रमाणे सर्वांना आच्छादणारी होऊन तिने हिमालयसुद्धा आपल्या सावलीत घेतला आहे. बयोच्या रूपाने असामान्याची जी व्यक्तिरेखा उभी राहते ते या नाटकाचे यश आहे. खरे म्हणजे हेही बरोबर नाही. कारण बयो आणि भानू मिळून एकच ध्येयवाद साकार होत असतो. जीवनाला कर्मयोग्यांचा कर्मयोग पुरतो. ललित वाङ्मयाला हा केवळ कर्मयोग पुरत नाही. त्या कर्मयोग्यांच्या व्यक्तित्वात एक सामान्यही दडलेला असतो. तो जळताना आक्रोश करतो आणि या दहनातून शुद्ध होत जातो. शिवाजीचा आक्रोश,संभाजीचा आक्रोश अगर भीष्मांचा आक्रोश व्यक्त करणारी प्रतिमूर्ती त्या ठिकाणी उभी करता येणे शक्य नव्हते. बयोमुळे हिमालयही उभा राहिला आहे, नाटकही उभे राहिले आहे आणि बयो तर उभीच आहे.

१६४/ रंगविमर्श