पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लावणाऱ्या बयो आणि भानूंची कहाणी पाहताना बयोचे सामान्यत्वच जाणवत राहते. भानूंचे असामान्यत्व जाणवत राहते. कारण बयो हे असे पारदर्शक व्यक्तित्व आहे. बयोने उदात्त ध्येयवादाचा वसा कर्मयोगी तत्त्वज्ञाप्रमाणे घेतलेला नाही. तो सर्वांच्या विषयी जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेल्या संतांच्याप्रमाणे घेतलेला आहे. यामुळे बयोची संकोचाची सर्व बंधने गळून पडलेली आहेत. आपल्या मुलांचे सांत्वन करताना ती पतीची चेष्टा करणे गौण समजत नाही. शब्द वापरीत असताना मांगल्याचा वसा घेतलेल्या बयोचे हात सदैव चिखलात बरबटलेले आहेत. या प्रेममय हातांना लागलेली सर्व घाण जशी रमणीय प्रसन्न व्हावी त्याप्रमाणे बयोच्या तोंडातील सर्व फटकळ शिवीगाळसुद्धा तिच्या जिव्हाळ्याने रमणीय व मधुर झालेली आहे. ज्याप्रमाणे एखाद्याची बाळंतपणे करण्यासाठी बयो पुढे आहे त्याचप्रमाणे गरज पडेल तर दुसऱ्यासमोर हात पसरण्यासाठीसुद्धा बयो पुढे आहे. सर्वांची सेवा करताना बयोने आपपरभाव मानलेला नाही. तिला भीक मागतानासुद्धा आपपरभाव मानण्याचे कारण नाही. सर्वांच्या कल्याणासाठी जर बयोचे कष्ट हजर असतील तर एकाच्या कल्याणाखातर दुसऱ्यासमोर बयोने निःसंकोच पदर पसरलेला आहे. ज्या शक्तीने ती मुलांच्यासाठी पुरणपोळ्या मागून आणते त्या शक्तीवरच ती मुले व संसार सोडून पतीबरोबर जाऊ शकते. सामान्य प्रसंगी पतीचा धाडधाड अपमान करणे हे बयोसाठी सरळ आहे. असामान्य प्रसंगी पतीच्या ध्येयवादावरून मुले व सुना, लेकी आणि जावई ओवाळून टाकणे हेही बयोला सहज आहे. म्हणूनच बयो भानूंची वाणी होऊ शकते.
  आपला नवरा सूर्य आहे, आपला नवरा हिमालय आहे, आपला वसा कष्टाचा आहे, याची बयोला जाणीव आहे. किंबहुना बयोला याचीही माहिती आहे की मागे ज्या ज्या वेळी आपला नवरा जसाजसा वागला तेच बरोबर आहे. त्या त्या वेळी तो तसा वागला नसता तर बयोच्या लेखी भानूंचा रथ केव्हाच जमिनीला लागलेला असता. वैतागाने बयो जरी असेही म्हणाली की, सूनबाई सासऱ्याची कीर्ती तुझ्या वाट्याला आली आहे, त्याच्या थोरवीच्या झळा मला भोगाव्या लागल्या आहेत, बाई, तुझे भाग्य मोठे म्हणून तू यांची पत्नी झाली नाहीस. तरी बयोचे खरे मत हे आहे की, त्यांची बायको म्हणून मला धन्य धन्य वाटायचे, माझा ऊर भरून यायचा. बयोने जाणीवपूर्वक ही जी ध्येयवादाची

हिमालयाची सावली / १६३