पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाटते. आपली निवेदनशक्ती गमावलेले विकल भानू या सृष्टीच्या व्यवहारातील जखमी ध्येयवादाचे प्रतीक आहेत आणि तरीही नवा मठ उभारण्यास ते सिद्ध आहेत. हे या शल्यावर मात करणारे अजिंक्य मन आहे. भानूंच्या रूपाने एक हिमालय उभा आहे. त्याची सावली जे या मानदंडाच्या आश्रयाला आले त्या सर्वांचे जीवन जाळीतच गेली आहे. वृक्ष जसे सावली होतात तशी सावली हिमालयाला होता येत नाही हा त्याचाही दोष नाही.

भानूंची माया
  प्रो. भानू हे नुसते कर्तव्यनिष्ठच आहेत, कर्तव्यकठोर आहेत असे दिसते, पण हे दिसणे खरे नव्हे. भानूंची माया बयोप्रमाणे सतत बोलकी होत नाही; पण आज आपली पली क्षुब्ध आहे, तिला कुणीतरी आग्रह करून जेवू घातले पाहिजे हे भानूंना कळते. घराबाहेर पडताना तशी सूचना भानूंनी दिलेली आहे (पृष्ठ ३१). आपले मृत्युपत्र लिहिताना भानू तशी वेळच आली तर आपल्या मुलांच्या कुटुंबियांना आश्रमाने दोन वेळा जेवू घालावे अशी तरतूद करतात (पृष्ठ ४०). ही फुले आपल्या हाती शोभत नसली तर तुमच्या हाती घ्या असे पत्नीविषयी जिव्हाळ्याने सांगतात (पृष्ठ ४७). सावित्री, मुले सज्जन आहेत, सालस आहेत, सरळ आहेत, अशी मुलांची बाजू घेऊन ते पत्नीशी प्रतिवाद करतात (पृष्ठ ५०). आपण संसार धडपणे करू शकलो नाही याची त्यांना जाणीव आहे (पृष्ठ ५४). केशवने प्रवासात थंडी असल्यामुळे अंथरूण-पांघरूण न्यावे असे ते सांगतात (पृष्ठ ५७). सावित्री, तुझी चिंता मला समजते. मी केशवच्या नोकरीसाठी स्वतः शब्द टाकावयाचं ठरवलंय, असेही ते सांगतात (पृष्ठ ६६). सर्वांचा निरोप घेताना ते आपल्या पत्नीला सांगतात, खरोखरी मी मलांचे काही केले नाही. त्यांना फार सोसावे लागले, त्यांचा राग करू नकोस (पृष्ठ ८४). प्रो. भानूंच्या बाबत ही नोंद मुद्दाम करावी लागली आहे, कारण बयोइतकेच भानूंचे अंतःकरण प्रेमळ आहे हे आपण विसरतो. बयो संसाराच्या खस्ता खाते, भानू उग्र तपाचे आचरण करतात, इतकेच खरे नाही. बयोही उग्र तपाचे आचरण करते, भानूही जिव्हाळ्याने भरलेले आहेत हा दुसरा भागही खराच आहे.

बयोची व्यक्तिरेखाा
  एका भव्य ध्येयवादावर भारावलेल्या, त्या ध्येयवादासाठी सर्वस्व पणाला

१६२ / रंगविमर्श