पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठरवितात. ही खरी म्हणजे भानूंचा प्रखर ध्येयवाद न पेलल्यामुळे झालेली भानू व आश्रमाची ताटातूट आहे. ज्या वेळी हा प्रसंग उद्भवतो तेव्हा बयोची इच्छा ही आहे की, भानूंची इच्छा गुंडाळून ठेवून आश्रमाच्या संचालक मंडळाने केशवची नोकरी चालू ठेवायला पाहिजे. पण बयोची ही इच्छा तिलाच पटणारी नाही. तिला मनातून असे कुठेतरी वाटते की विजय भानूंचाच व्हायला पाहिजे. प्रत्यक्षात भानूंना कौन्सिलवरून निवृत्त करण्यात येते. या वेळी बयोचा सगळा ध्येयवाद उचंबळून आलेला आहे. तिला आता जावई आणि मुलगी यांचे हित पतीच्या प्रतिष्ठेपेक्षा गौण वाटू लागतात. कारण पणाला लागली आहे ती भानूंची प्रतिष्ठा नसून त्यांच्या ध्येयवादाची प्रतिष्ठा आहे. या विशिष्ट क्षणी बयोला आपला पती व त्याच्या ध्येयवाद याखेरीज इतर कुणाचे नाते उरलेले नाही.
  पहिल्या अंकाच्या शेवटी बयो आपल्या पतीचे वर्णन करताना असे सांगते, "माझ्या सोन्या, ध्यानात घे. प्रसंग ओढवला तर ते कोणाचे कोण्णी नव्हत. आईबाप, बायको, मुले, बहीण, भाऊ त्यांचे कोणी कोणी नव्हत. त्यांचा आहे फक्त आश्रम रे आश्रम." बयोचे हे विधान ऐकताना चटकन हे लक्षात येत नाही की हे नुसते भानूंचे वर्णन नव्हे, बयोचे स्वतःचे वर्णन आहे. तसाच प्रसंग ओढवला तर बयोला तिच्या पतीशिवाय दुसरे नातेवाईक नाहीत. तिचे खरे नाते पतीशी नसून त्याच्या ध्येयवादाशी आहे. तिसऱ्या अंकाच्या पहिल्या प्रवेशात भानूंचा आश्रम तुटतो, ही एक ताटातूट आहे. हिची व्यथा भानूंच्या पक्षघातात साकार झालेली आहे, पण बयोचा आश्रम आधीच तुटलेला होता. या निमित्ताने मुलगी आणि जावई ह्यांचा पाश तोडून टाकते. या आघाताने भानू खचतात त्या वेळी बयो सर्वांच्या संघर्षात ताठ उभी आहे. शेवटच्या प्रवेशात जेव्हा वाचा बंद होते त्या वेळी भानूंचा जगाशी भाषिक संबंध तुटतो. भानूंचा जगाशी जेव्हा भाषिक संबंध तुटतो तेव्हाच बयोच भानूंची वाणी होते.

बयो भानूंसारखीच कठोर होते
 जेव्हा बयो भानूंची वाणी होते त्या वेळी बयो भानूंइतकीच कठोर आणि क्रूर होते. म्हाताऱ्या आणि विकल अशा पतीला चालण्यासाठी हात दिला पाहिजे असे तिला वाटत नाही. वाचाशक्ती संपलेल्या आणि शरीर अपंग झालेल्या या आपल्या पतीला कुणाच्याही आधाराशिवाय चालता आले पाहिजे असे बयोला

रं....११
हिमालयाची सावली/१६१