पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतो. हा संघर्ष म्हणजे वाईटाचा चांगल्या विरुद्ध संघर्ष नव्हे. हा शिवाचा शिवेतराविरुद्ध संघर्ष आहे. या संघर्षात कुणाचाही विजय झाला तरी ते मानवजातीचे अखंड प्रवाहित होणारे दुःख असते. या नाट्यातील ही जात लक्षात घेऊन या नाटकाकडे पाहिले पाहिजे.

भानू आणि केशव
  दुसऱ्या अंकात भानू आणि केशव यांची ताटातूट होते. केशव खरे म्हणजे वाईट काहीच करीत नाही. जिच्या अन्नावर आपण वाढलो तिच्या मुलीशी लग्न करून तो ऋणमुक्त होतो आहे. जिच्यावर आपले प्रेम आहे तिच्याशी प्रामाणिक राहून तो प्रेमाचे दायित्व निभवीत आहे आणि शिवाय विधवेच्या संततीशी विवाह करून आश्रमाला जीवन वाहण्याचे ठरवून तो कृतीने सुधारक होत आहे, त्यागही करीत आहे. पण भानूंना केशव आजन्म अविवाहित राहणारा कर्मयोगी मठाचा कार्यकर्ता म्हणून हवा आहे. भानूंना आपली मुलगी परदेशात जायला नको, कारण ह्या शिक्षणाचा आश्रमाला उपयोग होणारा नाही. परदेशगमन आश्रमाला उपयोगी पडावे यासाठी म्हणून ते मुलीवर अन्याय करायला तयार आहेत. कर्मयोगी मठाला कार्यकर्ता मिळावा म्हणून भानू मुलांचा संसार विस्कटायला तयार आहेत. पुन्हा एकदा ध्येयवाद्यांच्या जीवनातील ध्येयवादाला अंगभूत असणारे क्रौर्य उफाळून वर येते. पण या ठिकाणी भानूंचा निर्णय बयोला पटत नाही. बयोच्या आग्रहामुळे केशव-कृष्णाचे लग्न होऊन जाते. असे दिसते की बयोने इथे भानूंवर मात केली आहे, पण हे दिसणे खरे नव्हे. खरे असे आहे की, केशवचा निर्णय कितीही दुःखद असला तरी तो चूक आहे असे भानूंना वाटत नाही. म्हणून एरव्ही हट्टाने बयोच्या विरोधात उभे राहणारे भानू इथे फक्त गप्प बसतात. भानूंनी हट्ट न करता गप्प बसणे या घटनेचेच एक रूप बयोने जिद्दीने लग्न पार पाडणे हे आहे. कारण भानूंनाच हा निर्णय घेता येत नाही की ज्याची संसार करण्याची इच्छा आहे ते कर्मयोगी मठाचे कार्यकर्ते होऊ शकतील काय?

भानूंची आणि आश्रमाची ताटातूट
  तिसऱ्या अंकाच्या पहिल्या प्रवेशात विपुल पैसा मिळतो आहे या मोहाने आश्रमाची संचालक मंडळी भानूंना बाजूला सारून कार्यालय मुंबईला न्यायचे

१६० / रंगविमर्श