पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



आपल्या मुलांच्यासाठी, विशेषतः पुरुषोत्तमाच्यासाठी, विम्याचे तीन हजार रुपये जपलेले असतात. वर्षानुवर्षे या तीन हजार रुपयांवर तिने आपल्या आशा गुंतवलेल्या असतात. ह्या आश्रमासाठी बयोचे हे पैसेही जातात. बयोच्या वाट्याला संसाराच्या खस्ता, मुलांचे कष्ट, वेळोवेळी होणारे अपेक्षाभंग आणि पतीकडूनही होणारा मानभंग याखेरीज काहीच येत नाही आणि तरीही बयो आपल्या नवऱ्याशी एकनिष्ठ आहे. वरवर पाहताना तर असे दिसते की, आर्य पतिव्रतेप्रमाणे ज्याच्या गळ्यात माळ घातली त्याच्याशी बयो एकनिष्ठ आहे. बारकाईने पाहिले तर असे दिसेल की, बयो या अस्थिचर्ममय भानूंशी बांधलेली नाही, तिची आद्यनिष्ठा भानूंच्या ध्येयवादाशी आहे. हा या नाटकातील अखंड असणारा योग आहे.
बयोची शरणागती
 बयो शेवटी आपल्या नवऱ्याला शरण जाते. कधी त्याचा उपवास, कधी अप्रतिष्ठेचा धाक बयोचा हट्ट मोडून काढतो. खरे म्हणजे बयो जर शरण जात असेल तर ती तिच्याच मनातील उदात्त ध्येयवादाला शरण जात असेल. भानू हे त्या ध्येयवादाचे फक्त प्रतीक आहे. आक्रोश करणाऱ्या बयोला कुठेतरी मनातून हे उमजलेले आहे की, सर्वस्वाची आहुती हे आपले कर्तव्य आहे आणि म्हणून भानूंचा निर्णय बरोबर आहे. बयोच्या रूपाने भानूंनी न केलेला आक्रोश व्यक्त होत असतो आणि म्हणून भानू अधून मधून बयोचे करणे रास्त आहे असा निर्णय देतात. भानूंच्या रूपाने बयोचा दाहक ध्येयवाद उभा असतो. बयो शरण जात असेल तर आपल्याच ध्येयवादाला शरण जात असते. या नाटकात भानू विरुद्ध बयो हा संघर्षच नाही. तो संघर्ष बयोविरुद्ध बयो किंवा भानू विरुद्ध भानू असा आहे. शेवटच्या अंकात जेव्हा बयो भानूच्या ध्येयवादाची प्रतिनिधी होते त्या वेळी भानू बयोच्या आक्रोशाचे प्रतिनिधी होतात. भिन्न व्यक्तित्वे असणारी पण ध्येयवादावर तादात्म्य पावलेली ही दोन भिन्न शरीरे आहेत. त्यांचा संघर्षच चालू असेल तर ज्यांच्या कल्याणासाठी ही आहुती दिली जात असेल त्यांच्या न संपणाऱ्या क्षुद्रत्वाविरुद्ध आहे.
  मानवी समूहाचे न संपणारे क्षुद्रत्व आणि माणसातच या क्षुद्रत्वाचा छेद देऊन उभा राहणारा हुंकार यांच्यातील संघर्ष अनंत यातनांनी आर्द्र झालेला


हिमालयाची सावली / १५९