पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 नाट्याच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही. वाङ्मयाला नाट्य गमावणे शक्य नसते.
बयोलाही आश्रम बंद
 प्रा. भानू पुनर्विवाहाचे काम महत्त्वाचे आहे म्हणून ते चालू राहिले पाहिजे असा निर्णय घेतात. हे काम करण्यासाठी तातोबांइतका विश्वासू कार्यकर्ता दुसरा नाही, म्हणून तातोबांनीच हे काम केले पाहिजे असे ठरवितात. तेव्हा विचारांती जे कार्य ठरले आहे ते चालू राहिलेच पाहिजे हे त्यांचे पहिले सूत्र आहे. या सूत्रानुसार अनाथ अबलाश्रमही चालू राहिलाच पाहिजे. आणि ते काम करण्यासाठी स्वतःइतका दुसरा लायक माणूस नाही. म्हणून तिथे राहण्याचा दुसरा निर्णय येतो. म्हणजे दोन्ही कामे चालू राहिली पाहिजेत आणि समाजाचे सहकार्य चालू राहिले पाहिजे. म्हणून तातोबाने आश्रमाशी संबंध सोडला पाहिजे, भानूंच्या घराशी संबंध सोडला पाहिजे. तातोबांची आश्रम आणि भानू यांच्याशी ताटातूट केवळ दोन कारणांमुळे होते. एक म्हणजे तातोबा भानूंच्या ध्येयवादाशी प्रामाणिक आहे. दुसरे म्हणजे भानूंना कमीत कमी संघर्ष घेऊन सुधारणा समाजाच्या गळी उतरवावयाची आहे. याबरोबरच भानू अजून एक विक्षिप्त निर्णय घेतात. आश्रमाच्या आरंभाच्या काळी जी आश्रमात स्वैपाकीप्रमाणे, मजूरणीप्रमाणे राबली आणि जिचे श्रम आश्रम उभारण्यासाठी भानूइतकेच महत्त्वाचे होते, जिने भानूंचा संसार जिद्दीने सांभाळला त्या बयोचे वाईट उदाहरण विधवा मुलींच्या समोर नको म्हणून ते बयोलाही आश्रम बंद करतात.
ध्येयवादाशी समरस न होणारी माणसे दूर जातात
 करारी आणि ध्येयवादी जीवनात जी माणसे तुमच्या ध्येयवादाशी समरस होत नाहीत त्यांची आणि तुमची ताटातूट होते हा एक भाग आहे. जगन्नाथ, पुरुषोत्तम आणि कृष्णा यांच्या रूपाने या वियोगाच्या खाणाखुणा उभ्या आहेत, पण जे तुमच्या ध्येयवादाशी समरस होतात त्यांचा या प्रामाणिक तादात्म्यामुळेच वियोग आणि मानभंग आहे हा दुसरा दुःखद पदर आहे. एका ध्येयवादाला बांधलेली माणसे कशी निष्ठुर आणि क्रूर होतात याचे हे द्योतक आहे. ती निष्ठुर आणि क्रूर असत नाहीत पण स्वतःचे आणि इतरांचे मानापमान, सुखदुःखे यांना या ध्येयवादी मंडळींच्या जीवनात फारशी जागा नसते. बयोने

१५८/ रंगविमर्श