पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुधारकवर्गाचा अडाणी म्हणून अधिक्षेप केला आहे. प्रत्येक सामाजिक प्रश्न हा एका सामाजिक परिस्थितीत जन्माला येत असतो. त्या परिस्थितीला निरपेक्ष होऊन प्रश्नाचा विचार करण्यात अर्थ नसतो. ही सामाजिक परिस्थितीच सामाजिक प्रश्नाभोवतालची गुंतागुंत निर्माण करीत असते. आमच्या सुधारक लेखकांना ही बाब नीटशी कधी कळली नाही.
 केशवपनाला विरोध करणाऱ्या हरिभाऊंनासुद्धा आपल्या नायिकेच्या मनात पुनर्विवाहाचा विचार कधीच आला नाही ही गोष्ट स्पष्ट करताना सुधारक म्हणून संकोचल्यासारखे वाटले नाही. तरुण विधवांच्या मनात पुनर्विवाहाचा विचारच येणे शक्य नसले, इतक्या जर त्या पतीशी एकजीव होत हा सामान्य नियम मानला, तर मग केस तरुणपणी काढले काय अगर म्हातारपणी काढले काय याचे महत्त्व गौण होते. पतीशी एकजीव झालेल्या विधवेला आपण सुंदर दिसावे, आपले सौंदर्य शिल्लक उरावे ही गोष्ट जाणवण्याचे काहीच कारण नाही. केशवपनाचा प्रश्न अपरिहार्यपणे सामाजिक प्रश्न म्हणून विधवाविवाहाशी निगडित आहे, ही गोष्ट हरिभाऊंना जाणवली नाही. आणि विधवाविवाहाचा प्रश्न तितक्याच अपरिहार्यपणे परंपरामान्य असलेल्या पातिव्रत्य या कल्पनेला संपूर्णपणे विरोधी आहे. विधवाविवाह हा सुटा प्रश्न नसतो. त्याच्या बाजूला परित्यक्तांचाही प्रश्न असतो. ही गुंतागुंत त्या काळी कुणीच विचारात घेतली नाही. कारण लेखकांच्यासमोर प्रत्येक प्रश्न हा सुटा प्रश्न आहे. हे सुटे प्रश्न ज्या परिस्थितीचा भाग आहेत, त्या परिस्थितीत ते एकमेकांशी बांधले गेलेले आहेत. वैचारिक पातळीवर समाजसुधारणांचा विचार करताना कोणत्याही एका बुरुजावर निकराचा हल्ला झाला की सारी तटबंदी शिथिल होते अशी भूमिका घेता येते. कलावंतांना सामाजिक प्रश्न कलेच्या पातळीवर नेताना प्रत्येक बुरूज हा एका संपूर्ण तटबंदीचा भाग आहे हे विसरून चालत नव्हते.
 प्रश्नांचा सुटा विचार करणे ही जी त्या वेळची सार्वत्रिक पद्धत त्याला हरिभाऊ, कोल्हटकर, खाडिलकर, गडकरी- कुणीच अपवाद नव्हते. वामन मल्हारांच्यापासून प्रश्नांचे आंतरिक संबंध लेखकांना क्रमाने दिसू लागतात. सामाजिक प्रश्नावर नाटक लिहावे असा आग्रह आजही नाही. देवलांच्या काळी तर मुळीच नव्हता; पण सामाजिक प्रश्नावर लिहायचे म्हटल्यास तो प्रश्न नीट माहीत असावा इतका आग्रह मात्र जरुरीचा ठरतो. कारण कलावंत जे उमजलेच

देवलांची शारदा / १५