Jump to content

पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साऱ्या घटनांचे पडसाद निरनिराळ्या नाटकांमधून उमटत होतेच. बाला-जरठ विवाहावरच 'म्हातारचळ', 'जरठोद्वाह', 'कन्याविक्रय दुष्परिणाम', 'पद्मावती' यांसारखी नाटके देवलांच्यापूर्वी लिहिली गेली होती. सुधारकांना विरोधी म्हणून सनातन्यांनीही काही नाटके लिहिली होती.
 या सामाजिक नाटकांमधील बहुतेक नाटके प्रयोगात संपूर्णपणे अयशस्वी ठरली. ज्यांना थोडेफार यश मिळाल्यासारखे काही काळ जाणवले, तीही नाटके ललित वाङ्मय म्हणन अयशस्वीच होती. सामाजिक प्रश्न मांडणारे सामाजिक नाटक म्हणून देवलांच्यापूर्वी एकाही नाटककाराचे लिखाण कलाकृती म्हणून विचारात घ्यावे यासाठी आवश्यक असणाऱ्या किमान पातळीपर्यंतसुद्धा पोहोचू शकले नव्हते. तरी पण सामाजिक नाटकांची खळबळ देवलांच्यापूर्वी चालूच होती. 'शारदा हे पहिले सामाजिक नाटक म्हणताना नेमका अभिप्रेत अर्थ कलाकृतीच्या पातळीवर पोहोचलेले पहिले सामाजिक नाटक असा असतो. हरिभाऊंच्यापूर्वी बाबा पद्मनजी आहेत. तरीसुद्धा कलात्मक पातळीवर सामाजिक कादंबरी प्रथम हरिभाऊंनीच नेली असे आपण म्हणतो. कादंबरीच्या क्षेत्रात जसे हरिभाऊंचे यश आहे तसे नाटकांच्या क्षेत्रात देवलांच्या 'शारदेचे यश आहे, पण हरिभाऊंना आशयाचा वास्तववाद उपजत होता, देवलांना तो प्रयत्नपूर्वकही आत्मसात करता आलेला नाही.
 
देवलांच्या मर्यादा
 सामाजिक नाटककार म्हणून देवलांच्याकडे ज्या वेळी आपण पाहू लागतो, त्या वेळी देवलांच्या मर्यादा प्रथम लक्षात येऊ लागतात आणि हेही लक्षात येऊ लागते की, दोष देवलांचा नसून ज्या पातळीवर सुधारणेची चळवळ देवलांच्या काळी होती, त्या पातळीचा हा दोष आहे. आगरकरांसारखा महान प्रज्ञाशाली पुरुष बुद्धिप्रामाण्यवादाचा आग्रहाने पुरस्कार करताना या काळात दिसतो, पण त्यांनाही समाजसुधारणेचे जे प्रश्न जाणवले, ते पश्चिम महाराष्ट्रातील ब्राह्मणांचे प्रश्न होते. आगरकर सोडल्यास इतर समाजसुधारकांना सुधारणावादासाठी आवश्यक असणारे झुंजार मनच नव्हते. जे सामाजिक प्रश्न या सुधारकांच्यासमोर उभे होते, त्या प्रश्नांचे स्वरूप सर्व गुंतागुंतीनिशी या सुधारक मंडळींना फारसे कळल्याचे दिसत नाही. पुढे याच मुद्द्यावर डॉ. केतकरांनी

१४/ रंगविमर्श