पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाहीत त्याचे चित्रण करू शकणार नाहीत. बाला-जरठ विवाहाचा प्रश्न हा अशा गुंतागुंतीच्या प्रश्नांपैकी आहे. त्या प्रश्नाचे स्वरूप केवळ वधू-वरांच्या वयातील अंतराइतके सोपे नाही. दहा वर्षांच्या मुलीचे लग्न चाळीस वर्षांच्या वराशी होणे ही घटना जितकी चिंताजनक आहे, तितकी साठ वर्षांच्या मुलीचे लग्न नव्वद वर्षांच्या वराशी होणे ही चिंताजनक घटना नाही. वयाचे अंतर तेच असले तरी सगळा संदर्भ विवाहाच्या वेळी असणाऱ्या वयामुळे बदलून जातो. दुसऱ्या प्रकारच्या विवाहात निदान मला तरी तीस वर्षांचे अंतर आक्षेपार्ह वाटत नाही.
 बाला-जरठ विवाहाचा प्रश्न एका बाजूने बालविवाहाशी निगडित आहे. सर्व मुला-मुलींची लग्ने लहान वयात व्हायची म्हटल्यानंतर दहाव्या वर्षापर्यंत मुलींची लग्ने होऊन जातील आणि आठ वर्षांच्या मुलीचे लग्न करणे प्रशस्त मानले जात असे. परिस्थितीनुसार ही वयोमर्यादा दोन-तीन वर्षांनी वाढत असे, पण बहुतेक मुलींची लग्ने ऋतुप्राप्तीपूर्वी होऊन जात. क्वचित एखाद्या मुलीला विवाहापूर्वी ऋतू प्राप्त झाला, तर मग लग्न जुळणे फारच कठीण होत असे आणि म्हणून अशा वेळी ऋतुप्राप्तीची घटना कसोशीने चोरून ठेवण्यात येई. एरव्ही ऋतुप्राप्ती हा सोहळ्याचा भाग असे. देवलांच्या नाटकात विवाहोत्तर ऋतुप्राप्तीच्या सोहळ्याचाही उल्लेख आहे. विवाहपूर्व ऋतुप्राप्तीच्या घटनेचेही चिंता म्हणून वर्णन आलेले आहे. मराठवाडा भागात ही परिस्थिती माझ्या लहानपणी मी पाहिलेली आहे.
  या सामाजिक परिस्थितीत बहुतेक मुलांचे लग्न सोळाव्या वर्षाच्या आतच होऊन जात असे. असा हा मुलगा ऐन पंचविशीत विधुर झाल्यास या मुलाने काय करावे? स्वतः न्या. रानडे व हरिभाऊ असे तिशीच्या सुमारास विधुर झालेले होते. या मंडळींना बारा-चौदा वर्षांच्या मुलीशी लग्न करण्याशिवाय दुसरा मार्गच मोकळा नव्हता. सोळा-सतरा वर्षांच्या विधवेने वर्ष-दीड वर्षाच्या बऱ्यावाईट संसाराच्या आठवणींवर उरलेल्या जीवनाचा उन्हाळा संयमाने भोगावा ही अपेक्षा जितकी चूक, तितकीच तिशीच्या सुमारास पुरुषाने पुढचे आयुष्य व्रतस्थ राहण्याची प्रतिज्ञा करावी ही अपेक्षा चुकीची आहे. म. गांधींच्यासारख्या अपवादभूत व्यक्तीचा नियम या ठिकाणी उपयोगी पडणारा नाही. कारण सामान्य माणूस तिसाव्या वर्षी वानप्रस्थ स्वीकारण्याची कल्पना मान्य करणार नाही. विषम-विवाह हे या परिस्थितीचे अपत्य आहे.

१६ / रंगविमर्श