पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आकार धारण करणारी ही मुले आपल्या मात्यापित्याच्या व्यक्तित्वाच्या कोणत्याही अंशाने प्रभावित होत नाहीत हेच एक दुर्दैव म्हणायला पाहिजे. असामान्यांच्याही जगाला प्रभावित करणाऱ्या विचित्र मर्यादा असतात असा याचा अर्थ आहे.
  पण या अंकातील यापेक्षा महत्त्वाच्या ताटातुटी निराळ्याच आहेत आणि त्या ताटातुटी अतिशय दुःखद आहेत. भानूंनी ज्याप्रमाणे अनाथ महिलांचा आश्रम चालवलेला आहे, त्याचप्रमाणे त्यांनी पुनर्विवाह मंडळही चालवलेले आहे. या पुनर्विवाह-मंडळाचे काम भानूंचा मेहुणा तातोबा पाहतो. या तातोबाने लावलेल्या एका पुनर्विवाहामुळे भानूंच्या विरुद्ध प्रचंड वादळ उठलेले आहे. या वादळांना तोंड देताना भानू जे निर्णय घेतात ते धैर्याचे आहेत की भित्रेपणाचे आहेत ते सांगता येणे सोपे नाही.

अनाथ महिलाश्रम
  अनाथ महिलाश्रम हे भानूंच्या कर्तृत्वाचे फळ आहे. त्यासाठी लागणारी दगदग भानू करतात. कप्ट-यातनांचा वाटा त्यांचा, पैसा उभा करण्याची जबाबदारी त्यांची. उरलेले सर्व सदस्य शरीराला झळ न लावता पैशाची फारशी झळ सहन न करता भानूंना सहकार्य देणारे आहेत. पुनर्विवाह-मंडळाचे कामही भानूंचेच. या कामावर त्यांची श्रद्धा आहे. हे काम सातत्याने व नेटाने चालले पाहिजे असे त्यांना वाटते. तातोबांनी पुनर्विवाह लावला ह्यात त्याची काही चूक झाली असे त्यांना वाटत नाही. या वेळी अपेक्षा अशी की, पुनर्विवाह मंडळाचे काम हे धैर्यपूर्वक भानूंनी चालवायला पाहिजे आणि उरलेल्या दिखाऊ व चतुर सुधारकांना जाहीर आव्हान द्यायला पाहिजे. कारण भानू म्हणजे अखंड संघर्ष आणि हा संघर्ष करताना कोणतीही भीती त्यांच्याजवळ नाही. एकदा जो निर्णय भानूंनी स्वतःशीच विचार करून ठरवला तो निर्णय बदलणे पुन्हा कुणाला शक्य नसते. तेव्हा भानच्या रूपाने सर्वांना आव्हान देणारा विजांचा कडकडाट साकार व्हायला पाहिजे ही आपली अपेक्षा आहे. कानेटकरांचे मला महत्त्व जाणवते ते या ठिकाणी. त्यांनी महर्षी कर्वे यांचे सूत्र अचूक पकडलेले आहे. तेच भानूंच्या रूपाने साकार झालेले आहे. हे सूत्र बंडखोरांचे तर आहेच, पण या बंडखोराची इच्छा आपला विद्रोह सर्वांच्या गळी उतरविण्याची आहे. असा माणूस भडक

हिमालयाची सावली / १५७