पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणून लागला तरी काय, नापास म्हणून लागला तरी काय, बापाच्या दृष्टीने विसावे वर्ष संपले, जबाबदारी संपली इतकाच त्याचा अर्थ आहे. ही घटना पुरुषोत्तम गमतीने सांगत असला तरी त्याच्या मनात या बाबींचा प्रक्षोभ आहे.
  सगळ्याच ध्येयाला वाहून घेतलेल्या पुरुषांच्या जीवनातील ही कहाणी आहे. ते आपल्या ध्येयवादाला सर्वस्वी प्रामाणिक राहणारे असतील तर आपल्या आप्त-स्वकीयांची आणि त्यांची मानसिक ताटातूट होणे स्वाभाविक आहे. पिता-पुत्रांच्या बाबतीत ध्येयवादी जीवनात येणारा हा दुरावा कानेटकरांनी शिवाजी व संभाजींच्या बाबतीतही दाखविला आहे. फक्त शिवाजी-संभाजीतील दुरावा दाखवताना त्यांची सहानुभूती संभाजीकडे वळली आहे. भानू आणि त्यांची मुले यांच्यातील दुरावा दाखवताना भानूंची मुले पढिक शिक्षणात कितीही मोठी असली तरी अंतःकरणाची उंची भानूंच्या मुलांना नाही. भानूंच्या मुलांचे व्यक्तिमत्व खुरटे आहे असे कानेटकरांनी गृहित धरले आहे. भानू आणि बयो यांच्यावर लक्ष केंद्रित करणे ही जी नाट्याची गरज त्यादृष्टीने ठीक असले तरी जीवनांच्या गरजांच्या दृष्टीने ही एक तडजोड आहे. भानूंची मुले बापाच्या सहवासात बुद्धिवाद आणि त्याग शिकतात. त्यांच्याही जीवनाला दिशा असते. फक्त भानूंशी त्यांचे जुळत नाही असा जीवनाचा नियम आहे.

कन्या कृष्णा
  भानूंची मुलगी कृष्णा हीही आपल्या पित्यापासून अशीच तुटलेली आहे. पुरुषोत्तमाप्रमाणे तिचे राग-लोभ स्पष्ट नाहीत, पण त्याबरोबरच तिचे कुणाशी ममत्वही स्पष्ट नाही. आईने ठरवून दिलेला पती तिला मान्य आहे. या पतीशी लग्न करून संसाराची नवी मांडामांड करण्याची तिची इच्छा आहे. या पलीकड़े कोणत्याच प्रश्नात तिला रस नाही. भानू सामाजिक निष्ठेमुळे संसारात तटस्थ झालेले आहेत. कृष्णाला आपला संसार मांडणे हा एक मुद्दा सोडला तर इतर सर्व बाबतीत तटस्थता आहे. अर्थात बयोच्या शिस्तीत वाढल्यामुळे कुण्याही ठिकाणी लिप्त न होता आपण सांगितल्या कामाचे धनी आहोत असे तिचे वागणे आहे. फक्त एकदा ती संतापाने बोलते आणि ती आपले लग्न विस्कटण्याची वेळ आल्यानंतर उरलेल्या वेळी सामान्य आनंद, सामान्य सुखदुःखे यांच्या पलीकडे पाहण्याची तिला गरज वाटत नाही. बयो आणि भानू यांच्या संपूर्ण सहवासात

१५६ / रंगविमर्श