पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अंकाला आरंभ होण्याच्या पूर्वीच भानू सेवेतून निवृत्त झालेले आहेत. ज्या दिवशी भानूंनी एक कर्तव्य म्हणून विधवाविवाह केला त्याच दिवशी भानू आणि त्यांचा समाज यांची पहिली ताटातूट घडते. या भानूंनी अनाथ अबलांच्यासाठी आश्रम काढला म्हणजे त्या आश्रमाला सर्वस्व वाहून घ्यावे या बुद्धीने भानू नोकरी सोडतात. इथे व्यक्तिगत जीवनातील सर्व सुखे आणि सुरक्षितता यांच्याशी त्यांची ताटातूट झालेली आहे. या दोन-तीन ताटातुटींच्या बाबत कोणाचीही तक्रार नाही. कारण एका ध्येयवादी जीवनाला आरंभ झाला की या प्रकारच्या ताटातुटी घडतच असतात, त्या कर्तव्यबुद्धीने जाणीवपूर्वक स्वीकारलेल्या असतात, तिथे कुणाचीच तक्रार नसते, पण या वातावरणातून भानूचा संसार चालू असताना क्रमाने भानूंचा वडील मुलगा जगन्नाथ हा भानूंच्या पासून तुटून गेलेला आहे. आपल्या बापाला घराविषयी, संसाराविषयी कोणतीही माया नाही, आपुलकी व आत्मीयता नाही. प्रेमशून्य कर्तव्यबुद्धीने बाप फक्त विसावे वर्षांपर्यंत आपले पालन-पोषण करणार आहे, या कर्तव्याखेरीज आपला आणि बापाचा संबंध नाही हे तीव्रपणे जाणवल्याच्या योगाने धाकटा मुलगा पुरुषोत्तम मनाने भानूंच्यापासून पूर्ण तुटून गेलेला आहे. पुरुषोत्तमाची आणि भानूची ताटातूट हा या नाटकाचा आरंभ आहे. या सर्व ताटातुटींना आवर घालणारा धागा भानूंची पत्नी बयो आहे. तिचे वात्सल्य, तिचा प्रेमळपणा, कुटुंबियांच्यासाठी तिने घेतलेले कष्ट या जोरावर हा तुटणारा संसार भानूंशी जोडला जातो. ज्या क्षणी बयो आदिशक्तीच्या रूपात भव्य होऊन साकार होते त्या क्षणी बयोचा आपल्या मुलाशी संबंध तुटतो, हा या नाटकाचा शेवट आहे. मुलांचे बापाशी क्रमाने संबंध तुटणे किंवा भानूंचे सर्वांशीच क्रमाने संबंध तुटत जाणे हा या नाटकातील नित्य वियोगाचा पदर आहे. बयोचे सर्वांशी संबंध तुटणे हा या नाटकाचा असामान्य वियोगात होणारा शेवट आहे. म्हणूनच या नाट्यकथेला मी नित्य ताटातुटींची कथा असे म्हटले आहे.

पुत्र पुरुषोत्तम
  नाटकाला आरंभ होतो तो दिवस पुरुषोत्तमाच्या पदवीच्या निकालाचा आहे आणि पुरुषोत्तम जितका कष्टाळू तितकाच बुद्धिमान असा विद्यार्थी आहे. या क्षणी तो विसावे वर्ष संपण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. आपला निकाल पास

हिमालयाची सावली/१५५