पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हॅम्लेटपेक्षा निराळेपण आपल्याला सांगता येणार नाही.

शोकान्त आणि शोकात्म
  'हिमालयाची सावली' हे शोकान्त आणि शोकात्मक नाटक आहे. हे शोकात्म आहे हे एखाद्या वेळी समीक्षा कबल करील पण शोकान्त आहे हे कबूल करणार नाही. ज्या ठिकाणी माणूस मरतो, मूल्ये शिल्लक राहतात, सगळेच चांगूलपण वाया जाते ते शोकान्त नाटक आपल्याला परंपरेने परिचित आहे. ज्या ठिकाणी सर्व प्रकारचा झगडा देताना शेवटी माणसाचा कणा तुटतो आणि मूल्ये मरतात, पण माणूस शिल्लक राहतो. या तडजोडीत आधीचा सगळा उदात्त संघर्ष वाया गेलेला असतो. हाही शोकात्मच अनुभव आहे. तिथेही उमेदपण वायाच जाते. आपण हा शोक कल्पनेने जाणू शकतो. ललित वाङ्मयात हा शोक सर्व भव्यतेनिशी क्वचितच व्यक्त झाला आहे. पण ज्या ठिकाणी काहीच वाया जात नाही आणि माणसे पराभूतही होत नाहीत तिथेही एक सुन्न करणारा शोक असतो. या शोकाची जात मान्य करणे व अशा नात्यातील शेवटाला शोकान्त म्हणून मान्यता देणे अजून समीक्षेला पटत नाही. जर आपण शोकाची ही दुसरी जात मान्य करणार असू तर आदर आणि भयाचा प्रत्यय देणारी शोकात्मिका आपण मान्य करायला पाहिजे. तिचाही भीषण आविष्कार आपण स्वीकारला पाहिजे. 'हिमालयाची सावली' ही या गटातील शोकात्मिका आहे. ती शोकात्मिका म्हणूनच पाहणे भाग आहे. ती शोकान्तिकाही आहे, मग हे आपण करू अगर करणार नाही.

ताटातुटीचे विविध रंग
 } 'हिमालयाची सावली' ही प्रो. भानूंच्या जीवनातली शेवटच्या पाच-सात वर्षांतील घटना सांगणारी नाट्य-कथा आहे. या नाटकापुरता ज्या ठिकाणाहून

आरंभ झालेला आहे त्यापूर्वी पुष्कळशा घटना घडून गेलेल्या आहेत. अनाथ विधवांच्यासाठी गावाच्या बाहेर माळरानावर भानूंनी एक आश्रम काढलेला होता. नानाविध अडी-अडचणींना तोंड देत भानूंनी या आश्रमाचा प्रपंच मोठ्या जिद्दीने सांभाळला आहे. भानूंनी केलेल्या या कार्याबद्दल समाजामध्ये फार मोठा पाठिंबा नसला तरी त्यांना प्रतिष्ठा व कीर्ती मिळालेली आहे. भानूंच्या सर्व प्रकारच्या वृद्धापकाळाचा आरंभ हा ह्या नाटकाचा आरंभ आहे. पहिल्या

१५४ / रंगविमर्श