पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कणाकणाने साठत आलेले असते. 'हिमालयाची सावली' ही अशा अखंड ताटातुटीची कहाणी आहे आणि या ताटातुटीला संपूर्णपणे तुच्छ करून टाकणाऱ्या तेवढ्याच यातनामय अशा अखंड योगाचीही ती कहाणी आहे. विरह दुःखद असतात हे आपण जाणतो, पण संयोगही तितकेच दुःखद असतात. अशा या व्यथापूर्ण योग-वियोगाची ही कहाणी आहे. सामान्यत्वे दुःख अनुकंपा जागी करतो. जे दुःख व्यक्तींनी आपल्या स्वभावगुणांमुळे ओढवून घेतलेले असते तेही अनुकंपा जागे करणारे असते. शोकात्म अनुभवाचा हा नित्य जाणवणारा प्रकार आहे.

शोक-दोन पातळ्या
  ज्याला आपण मानवी जीवनातील शोक म्हणतो, हा शोकच दोन भिन्न पातळ्यांवरचा आहे. ज्या ठिकाणी अनुकंपा आणि भीती असते, तिथे काहीतरी चांगले निष्कारणच वाया गेल्याची हळहळ असते. राहण्यासाठी घर बांधावे आणि उगीचच ते पडावे म्हणजे ज्याप्रमाणे एक कर्तृत्व वाया गेल्याचे जाणवते त्याप्रमाणे कोणताही श्रेष्ठ नायक आपल्या शोकान्त शेवटात नियतीच्या आघातामुळे वाया गेला हे जाणवते, पण ज्या वेळी एकाच्या विनाशात अनेकांच्या विकासाची बीजे दडलेली असतात, त्या वेळी हा शोक कितीही अनावर झाला तरी तिथे अनुकंपेला जागा नसते. ह्या जातीचा शोकात्मक अनुभव भीषण आणि सुन्न करणारा असला तरी तो अनुकंपा आणि भीतीने भारावलेला नसतो. तो आदर आणि भीतीने भारावलेला असतो. असामान्यांच्या जीवनाचा शोध घेताना ज्या दुःखाशी आपली गाठ पडते ते दुःख असे कृतार्थ दुःख असते ज्याला आपण आदरपूर्वक अभिवादन करतो. 'हिमालयाच्या सावली'त ज्या व्यथेला आपण सामोरे जात आहोत ती व्यथा योग-वियोगाची एक आकृती साकार करणारी आहे, पण हे योग-वियोग उमद्या माणसाच्या स्वभावदोषांतून येत नसून त्यांचा उगम उमद्या ध्येयवादाच्या स्वभावविशेषात असतो. हेही दुःख पचवणारी माणसे असतात, ही एक समाधानाची जाणीव असते. शोकात्म अनुभवाच्या या जातीची चर्चा अजून खोलात जाऊन समीक्षेने केलेली नाही. जोपर्यंत शोकात्म अनुभवाचा हा प्रकार आपण गंभीरपणे तपासून घेत नाही तोपर्यंत इब्सेनच्या ‘एनेमी ऑफ दी पीपल' सारख्या नाटकांचे

हिमालयाची सावली/१५३