पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नये? या प्रश्नाचे उत्तर देता येणे कठीण आहे. तरीही एक भाग शिल्लक राहतो. तोही अंश वाङ्मयविचारात महत्त्वाचा आहे. म्हणून हा प्रश्न उपस्थित करावा लागतो. तो मुद्दा असा आहे की सगळेच असामान्य एका जातीचे नसतात. मनानेसुद्धा काही असामान्यांच्या जवळ आपण पोहचू शकत नाही, ते नेहमीच आपल्या आटोक्याच्या पलीकडचे असतात. प्रो. भानू आणि त्यांच्याहीपेक्षा बयो नाटककाराच्यासाठी कल्पनेने जाणता येण्याइतपत निकट होती. हे निकटपण काळाचे नाही किंवा व्यक्तीच्या लहानमोठ्या स्थानाचे नाही. ते निकटत्व व्यक्तिमत्त्वाच्या जातीचे आहे. निदान कल्पनेने सत्यातली काही असामान्य माणसे काही कलावंतांना जाणता येतात. हे भाग्य लहान नाही. एरवी सगळाच कलांचा व्यवहार वृत्तिगांभीर्याच्या आविष्काराच्या दृष्टीने पोरका राहिला असता.
  हे सगळे प्रश्न प्रत्यक्ष वाङ्मयीन चर्चेला अनुषंगिक समजायचे. आपण संपूर्णपणे कलाकृतीच्या आत नसतो. म्हणून मनात येणारे असे समजायचे आणि ते बाजूला सारून प्रत्यक्ष साहित्यकृतीकडे वळायचे हे खरे काम आहे. आपले सगळे व्यक्तित्व कलाकृतीच्या बाहेरच घडत असल्यामुळे वाङ्मयाच्या महाद्वारात शिरल्यानंतरसुद्धा आपण आपल्याला विसरू शकत नसतो- इतकाच याचा अर्थ आहे. जे कलाकृतीच्या आत प्रवेश करताना बाहेरचे कोणतेच संचित घेऊन जात नाहीत त्या परमभाग्यशाली रसिकांचे सगळे व्यक्तित्व आत साकार होत असले पाहिजे.

अखंड ताटातुटीची / न संपणाऱ्या उभारीची कथा
  'हिमालयाची सावली' ही अखंड ताटातुटीची आणि त्यातून शिल्लक राहिलेल्या अजिंक्य मनाच्या न संपणाऱ्या उभारीची कथा आहे. यापैकी ताटातुटीचा धागा चटकन लक्षात येणार नाही. जो वियोग नित्य असतो तो नित्य असल्यामुळे इतका परिचित होऊन जातो की वियोग म्हणून जाणवतच नाही. तसे या नाटकाच्या कथानकाचे झाले आहे. पण वियोग नित्य असला तरी त्यामुळे येणारा दुःखभोग खोटा नसतो. कधी माणसांना या व्यथा सांगण्याची संधी मिळते, कधी ती मिळतच नाही, पण हा वियोग आरंभी जाणवो अगर न जाणवो, तो पुढे प्रचंड रूप धारण करणाऱ्या सर्व दुःखाची सामग्री एकत्रित करत असतो. जे शेवटी भव्य स्वरूपात उभे राहते ते किती तरी आधीपासून

१५२/ रंगविमर्श