पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संस्था आपल्या हातून निसटून जात आहेत हे पाहण्याचा योग कर्त्यांना आला होता. या घटनांचे दुःख त्यांना जाणवले असेलच, पण हे दुःख पूर्णपणे पचवून त्यांचे मन समत्वापर्यंत गेले होते. या कृतघ्न जगाचा निष्ठुर व्यवहार कर्त्यांची स्थितप्रज्ञता हलवू शकला नाही. ओघानेच आले आहे तर हेही सांगितले पाहिजे की, इरावतींना स्वतःचे एक भव्य व्यक्तित्व होते. अरुंधती जितकी सामान्य आहे तितकी इरावती सामान्य नव्हती.

घटनात्मक सत्य व प्रवृत्तिगत सत्य
  या सर्व नोंदी नाटककारांच्या बाबतीत दोष दाखवण्यासाठी म्हणून केलेल्या नाहीत. कलांचा व्यवहार संपूर्णपणे जीवनाचा आरसा कधीच नसतो. इतिहासात घडलेल्या घटनांचे अनुकरण करण्यापेक्षा कलावंतांना इतर पुष्कळच महत्त्वाचे ध्येय गाठावयाचे असते. घटनांच्या सत्यापेक्षा प्रवृत्तींचे सत्य त्यांच्यासमोर महत्त्वाचे असते आणि जीवनाचा जो एक समग्रपणा असतो तो कलेला कधीच असू शकत नाही. कलाकृतीत कुणीतरी नायक असतो, त्याला प्राधान्य असते. जीवनात कित्येक व्यक्ती हीच एक स्वयंपूर्ण कथा असते. कलाकृतीत ज्या व्यक्ती सामान्य होतात, जीवनात त्याही व्यक्तींना फार मोठे स्थान असते. कलाकृतींची सलगता आणि जीवनाचा समग्रपणा या बाबी नुसत्या भिन्न नसून भिन्न पातळीवरच्या आहेत आणि म्हणून महर्षी कर्त्यांचे या नाटककाराच्या प्रतिभाचक्षूला घडलेले दर्शन या ठिकाणी साकार झालेले आहे, असे म्हणून थांबले पाहिजे. प्रो. भानू हे कर्वे आहेत अगर नाहीत असे एकेरी उत्तर न देता, ते आहेत आणि नाहीत असे दुहेरी उतर दिले पाहिजे. यापुढे जाऊन असे म्हटले पाहिजे की, लेखकाने घटनात्मक सत्य बदलून प्रवृत्तिगत सत्य अधिक ठळक व उत्कट केलेले आहे.
 असामान्यांच्या चित्रणाच्या संदर्भात या नाटकाचा आपण विचार करू लागलो म्हणजे सहजच असा प्रश्न उद्भवतो की, जे यश कानेटकरांना शिवाजी व भीष्म यांच्याबाबतीत आले नाही ते यश भानू आणि बयो यांच्याबाबतीत का यावे? अंशतः हा प्रश्न वेडगळपणाचा आहे. एखाद्या नाटककाराची एखादी कृती यशस्वी का व्हावी? इतर कृती तितक्या यशस्वी का होऊ नयेत, याचे उत्तर कोण देणार? शेक्सपियरलासुद्धा सर्वच ठिकाणी हॅम्लेटचे यश का लाभू

हिमालयाची सावली / १५१