पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या नाटकांनी प्रथमच उपलब्ध होत आहेत.

जिवंत कलाकृतीचे सामर्थ्य शोधावे की वैगुण्य?
  या नाटकांच्या बाबतीत मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. हे नाटक निर्दोष आहे असे माझे मुळीच मत नाही. प्रो. भानू आणि बयो सोडल्यास उरलेल्या पात्रांना या नाटकात बाहुल्यांच्यापेक्षा जास्त जिवंतपणा आलेला नाही याचे मला भान आहे. कथानकाची मांडणी तपासून पाहू लागलो तर अजूनही कानेटकरांना भडक नाट्यमय घटना आणि कलाटण्या यांचा मोह वाटतो. तेवढ्यापुरते नाटक उथळ होत जाते. हे ह्याही नाटकात घडलेलेच आहे. ज्या पद्धतीने ह्या नाटकात घटना घडत जातात त्यात नेहमीच अपरिहार्यतेचे सूत्र राहिले आहे असे नाही. अशा प्रकारची दोषांची स्थळे तपशिलाने दाखवणे अवघड नाही. प्रश्न असा आहे की, निर्दोष कलाकृती शक्य नसल्यामुळे जेव्हा जिवंत आणि यशस्वी पण सदोष कलाकृती समोर येतात त्या वेळी मुख्य लक्ष कशावर असावे? या जिवंत कलाकृतीचे सामर्थ्य शोधावे की तिची वैगुण्ये शोधावीत? विशेषतः ज्या वेळी भोवतालचे सर्व वाङ्मय विकृतीच्या चित्रणात रस घेणारे असते आणि एखादा नवा प्रयोगही लक्षात येणे कठीण जाते अशा वेळी काय करावे? कानेटकरांच्या नाटकातील गुणस्थलांच्यावर माझा भर जर येत असेल तर त्याला कारण दोष दिसत नाहीत हे नसून गुण इतर कुणाच्या लक्षात आल्याचे उत्कटपणे जाणवत नाही हे आहे.

विशिष्ट व्यक्तींशी मिळतीजुळती पात्रे
 या नाटकाच्या बाबत एक प्रश्न हाही आहे की, या नाटकातील प्रो. भान हे भारतरत्न धोंडो केशव कर्वे आहेत काय? म्हणजेच याला अनुसरून या नाटकातील बयो कै. आनंदीबाई कर्वे आहेत काय? व याच क्रमाने इतर सर्व पात्रांच्या विषयीसुद्धा विचारता येईल. नाटककाराने याबाबत आधीच स्पष्टपणे इशारा दिला आहे की, वस्तुस्थितीशी थोडेफार साम्य आढळताच एकदम पात्रप्रसंगाच्या गळ्यात नावनिशीवार चिठ्या डकवण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये. त्यांना म्हणायचे ते हे की, प्रो. भानू यांना धोंडो केशव कर्वे समजण्यात येऊ नये. अशा प्रकारे जर ऐतिहासिक व्यक्तीशी नाटकातील व्यक्तीचे तादात्म्य कल्पिले तर काही अडचणी येतील असे बहुधा नाटककाराला वाटले असावे.

हिमालयाची सावली/१४९