पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. अभिनव गुप्ताने नट हा प्रतिभासंपन्न असतो याचा मुद्दाम उल्लेख केलेला आहे. नटांना कलावंत म्हणावयाचे असेल तर त्यांना प्रतिभाशाली मानणे भागच आहे. नाटककाराने जी प्रकृती उभी केली तिचा स्वीकार तर नट करतोच पण यापुढे जाऊन एका आधीच पूर्ण असलेल्या आकाराला त्याहून निराळे असणाऱ्या पूर्णात पचवून दाखवतो. या ठिकाणी प्रतिभाशाली नटाची नवनिर्मिती असते. ही नवनिर्मिती डॉ. लागूंच्या बाबत जशी 'नटसम्राट'मध्ये तीव्रपणे जाणवते तशी या नाटकात शांताबाईंच्यामध्ये जाणवते. शेजारी डॉ. लागू उभे असताना हा योग शांताबाईंना यावा हेच एक त्यांच्या अभिनय-कौशल्याचे मी यश मानतो.

वृद्ध नटांसमोर नवा पर्याय
  'नटसम्राट' आणि 'हिमालयाची सावली' या दोन नाटकांच्यामुळे म्हाताऱ्यांची नवीन नाटके झालेली आहेत. यापूर्वीच्या नाटकांमध्ये म्हातारे नव्हते अशातला भाग नाही. किर्लोस्करांच्या 'शाकुंतला'त कण्वमुनी आहेत. नाटकात एखादी व्यक्ती म्हातारी असणे हा माझ्यासमोरचा प्रश्न नाही. प्रश्न हे वृद्ध त्या नाट्याचे नायक असण्याचा आहे. वाङ्मयीन दृष्टीने हा मुद्दा गौण असला तरी नाट्यव्यवहाराच्या दृष्टीने हा मुद्दा महत्त्वाचा आहे. एकेक नट अगर नटी क्रमाने आपल्या अभिनयकौशल्याच्या जोरावर स्वतःचे स्थान निर्माण करीत वैभवाच्या शिखरावर जाऊन पोचतात. ज्या सामान्य नटांना कधीच कोणते महत्त्व नसते, त्यांच्यासाठी कधीच कोणते प्रश्न महत्त्वाचे नसतात; पण जे असामान्य प्रतिभाशाली नट उदयाला येतात त्यांच्या कर्तृत्वाच्या ऐन मध्यान्हावर त्यांच्यासमोर चमत्कारिक प्रश्न उभे राहतात. एक तर उतारवयात त्यांनी बेडौल दिसणारी तरुणांची कामे करावीत हा पर्याय शिल्लक असतो, नाही तर रंगभूमीवरून निवृत्त व्हावे हा दुसरा पर्याय शिल्लक असतो. 'नटसम्राट' आणि 'हिमालयाची सावली' या नाटकांनी असामान्य सामर्थ्य असणाऱ्या सर्व नटांच्या समोर एक तिसरा पर्याय उभा केलेला आहे. यापुढच्या पिढीतील बालगंधर्वांना चाळिशी ओलांडल्याच्यानंतरसुद्धा रुक्मिणी आणि शकुंतला होणे भाग पडणार नाही. जिथे शरीरसौंदर्य अप्रस्तुत होईल आणि व्यक्तित्व साकार करणारा अभिनय एक भव्य आणि दारुण नाट्य उभे करील अशा साहित्यकृती

१४८ / रंगविमर्श