पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकृती जेव्हा हे नट साकार करतात, त्या नटांना पात्र म्हणायचे, अशी ही पद्धत आहे. 'हिमालयाची सावली' या नाटकात शब्दातून प्रकृती उभी राहत असेल तर ती बयोच्या बाबतीत. नाटककाराच्या जवळ संवाद हेच सर्वांत महत्त्वाचे हत्यार असते. कादंबरीच्याप्रमाणे वातावरणनिर्मितीसाठी आणि वर्णनांच्यासाठी नाटककार शब्द उधळू शकत नाही. अंतर्मनासहित सगळे व्यक्तिमत्त्व फक्त शब्दांतून उभे करणे आणि तेही संवादातील शब्दांतून उभे करणे हे काम नाटककाराला करावे लागते. यामुळे सगळे व्यक्तिमत्व साकार करणाऱ्या प्रकृतीच्या भाषेला महत्त्व येते आणि ही प्रकृती जर अनेक पदरी, अनेक पातळीवरचे जीवन जगणारी असेल तर ते व्यक्तित्व संवादातून साकार होणे हे एक यश मानले पाहिजे.
 असल्या प्रकारची जिवंत, ठसकेबाज भाषा देवलांच्या 'संशयकल्लोळा'त, 'शारदे'त सापडते. ही भाषा म्हणजे खाडिलकरांचे ओजस्वी गद्य नव्हे किंवा गडकऱ्यांची धुंद अशी कल्पनाविलासाची आरास नव्हे. मागच्या महनीय श्रेष्ठ कलावंतांचा अवमान न करता हे नोंदविले पाहिजे की, बयो आणि भाषा यांचे तादात्म्य जसे साधलेले आहे तसा योग मराठी नाटकांच्यामध्ये यापूर्वी क्वचितच आला असेल. बहुतेक वेळेला हा अंगरखा भव्य प्रकृती असेल तर त्यांना थिटा असतो. थिल्लर प्रकृतींना अंगरखेच इतके पायघोळ होतात की माणूस दिसणे कठीण होते.

डॉ. लागू व शांताबाई जोग
  या नाटकाचा प्रयोग पाहताना काही गोष्टी तीव्रपणे जाणवल्या. डॉ. श्रीराम लागू हे प्रोफेसर भानूचे काम करतात आणि तेही सामान्य नट नव्हेत. त्यांच्या शब्दोच्चाराला दर ठिकाणी वेगळी धार आणि वजन असते. बयोचे काम सौ. शांताबाई जोग करतात. त्याही नवोदित नटींच्यापैकी आहेत असे समजण्याचे कारण नाही. विशेषतः शांताबाई जोगांचे हे रंगभूमीवर पुनरागमन आहे. एखादा नट हा नाट्यप्रयोगात नेमका कोणत्या स्थानी उभा आहे या प्रश्नाचे उत्तर देणे सोपे नाही. सामान्यपणे आपण असे म्हणतो की नट हा प्रकृतीशी एकजीव होऊन जातो. प्रयोगाच्या क्षणी तो प्रकृतीचे वाहन म्हणजे पात्र असतो. यात खोटे काहीच नाही. पण हे नाट्यप्रयोगात नटांचे जे स्थान असते त्याचे अपुरे वर्णन

हिमालयाची सावली/१४७