पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाषेचा पृथक विचार करावा काय हाच एक समीक्षेतील विवाद्य मुद्दा आहे. मराठी समीक्षेत हा मुद्दा जितका विवाद्य आहे तितका पाश्चिमात्य समीक्षेत हा मुद्दा विवाद्य आहे काय याविषयी मला शंका आहे. असे दिसते की ऑर्थर मिलसारख्या आधुनिक नाटककाराचा विचार करतानासुद्धा त्याच्या भाषेचा विचार स्वतंत्रपणे करणे यात पाश्चिमात्य समीक्षेत काही वावगे समजत नाहीत. कलाकृतीमध्ये असणारे आशय-अभिव्यक्तीचे अद्वैत ही कल्पना समजून घेण्यात घोटाळा झाला म्हणजे मग भाषेचा विचार करावा की करू नये हा मद्दा उपस्थित होतो. एक संपूर्ण माणूस ही एक स्वयंपूर्ण आणि एकात्म रचना असते, हे मान्य केल्यानंतरसुद्धा त्याच्या अवयवाचा वेगळा विचार करता येतो. ज्या घटकांनी पूर्ण साकार होतो ते घटक अवयव पूर्णाशी संपूर्णपणे सुसंवादी आणि एकजीव असले तरी त्यामुळे त्यांचा वेगळा विचार करावयाला अडथळा येऊ नये. कसेही असो, या नाटकातील बयोची भाषा ही मला स्वतंत्रपणे विचारात घेण्याजोगी वाटते.
 बयोच्या वाणीत आर्षपणा, ठसका, जिवंतपणा आणि धारदारपणा यांचे एक चमत्कारिक मिश्रण झालेले आहे. ही भाषा एकाच वेळी दिलखुलास आणि मोकळी पण गरजेनुसार तितकीच प्रसन्न आणि उदात्त होणारी अशी आहे. बयोचे जे व्यक्तिमत्त्व या नाटकात साकार झालेले आहे त्या व्यक्तिमत्त्वाशी ही भाषा एकजीव झालेली आहे. व्यवहार म्हणून जेव्हा एखाद्या नाट्यकृतीकडे आपण पाहतो त्या वेळी सगळ्याच प्रकृतींशी त्यांची भाषा एकजीव झालेली नसते हे आपल्याला दिसू लागते. तत्त्व म्हणून कलाकृतीची भाषा कलाकृतीशी एकजीव झालेली असते. प्रत्येक पात्राचे बोलणे त्याच्या व्यक्तित्वाशी एकजीव असते. तत्त्व म्हणून केलेले हे विवेचन अजून अस्तित्वात न आलेल्या आदर्श कलाकृतीतच सापडण्याचा तात्त्विक संभव आपण गृहीत धरू शकतो. व्यवहारात भाषा प्रकृतीशी एकजीव होण्याची शक्यता फार कमी असते आणि ज्या वेळेला भाषा प्रकृतीशी एकजीव होते त्याही वेळी त्या कलाकृतीत सर्वच प्रकृतींना हा योग आलेला नसतो.
  'प्रकृती' हा शब्द थोडासा अपरिचित वाटण्याचा संभव आहे. तो भरतनाट्यशास्त्रातील शब्द असून पौर्वात्य साहित्यशास्त्रात बहुरूढ आहे. कलाकृतीच्या आत ज्या व्यक्ती असतात त्यांना प्रकृती म्हणायचे. नाटकात ही

१४६ / रंगविमर्श